उद्यापासून नियमितपणे धावणार, दोन नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश, आजपासून आरक्षण खुले
प्रतिनिधी/खेड
कोकण मार्गावर २४ ऑक्टोबरपासून चालवण्यात आलेल्या मडगाव मुंबई (सीएसएमटी) फेस्टीवल स्पेशलला प्रवाशांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या गाडीला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार दीपावली सणासाठी दोन नव्या फेस्टीवल स्पेशल १ नोव्हेंबरपासून नियमितपणे धावणार आहेत. ३१ ऑक्टोबरपासून दोन्ही गाड्यांचे आरक्षण देखील खुले होणार आहे.
कोरोना हळूहळू नियंत्रणात येत असल्याने रेल्वे प्रशासनाकडून कोकण मार्गावर एकामागोमाग एक फेस्टीवल स्पेशल साप्ताहिक गाड्या चालवण्यात येत आहेत. कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा प्रतिसादही लाभत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर मडगाव-मुंबई फेस्टीवल स्पेशलच्या १६ फेऱ्या चालवण्यात आल्या. ही गाडी ३१ ऑक्टोबरपर्यंत चालवण्यात येणार होती.
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने या गाडीला मुदतवाढ देत साप्ताहिक गाडी न चालवता नियमितपणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन नव्या फेस्टीवल स्पेशल धावणार असून दोन्ही गाड्या आरक्षित असणार आहेत. ०१११२ क्रमांकाची मडगाव – मुंबई ( सीएसएमटी ) फेस्टीवल स्पेशल १ नोव्हेंबरपासून १४ जानेवारीपर्यंत नियमितपणे धावणार आहे. मडगाव येथील सायंकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता मुंबई ( सीएसएमटी ) ला पोहचेल.
परतीच्या प्रवासात ०११११ क्रमांकाची ही गाडी २ नोव्हेंबरपासून रात्री ११. ०५ वाजता मुंबई ( सीएसएमटी ) येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता मडगावला पोहचेल. ०१११४ क्रमांकाची मडगाव – मुंबई ( सीएसएमटी ) ही नवी गाडी सकाळी ९.१५ वाजता मडगाव येथून सुटून रात्री ९.४० वाजता मुंबई ( सीएसएमटी ) ला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबई ( सीएसएमटी ) येथून सकाळी ७.१० वाजता सुटून सायंकाळी ७ वाजता मडगावला पोहचेल.
२२ डब्यांच्या या गाडीला करमाळी, थिविम, पेडणे, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे, दादर आदी ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. या दोन गाड्या नियमितपणे धावणार असल्याने दीपावली सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.









