प्रतिनिधी/ मडगाव
सोनसडय़ावरील कचऱयाच्या व्यवस्थापनासंदर्भात मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने तेथील काही वादग्रस्त गोष्टी शोधून काढल्या आहेत तसेच राहून गेलेल्या कमतरतांवर कृती योजनेच्या अहवालात बोट ठेवले आहे, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्याचबरोबर या कमतरता दूर करण्यासाठी अहवालात उपायही सूचविले आहेत.
सदर अहवालानुसार, ट्रॉमेल कार्यरत नसून लँडफिलमध्ये टाकलेल्या सुक्मया कचऱयामुळे लाइनर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लँडफिल व्यवस्थापन सुविधेवर परिणाम झाले आहेत. महामंडळाने असे सूचविले आहे की, ओव्हरहेड पेन, स्क्रिनिंग मशीन, ट्रॉमेल्स यासारख्या यंत्रणा स्वच्छ करून रंगविल्या पाहिजेत. शिवाय मूळ उपकरण पुरवठादारामार्फत या सर्व यंत्रणांची देखभाल व्हायला हवी.
तातडीने पेन, ट्रोमेल आणि दुर्गंधीयुक्त सांडपाणी गोळा होणारी टाकी साफ करण्यास पालिकेला त्यात सूचविले आहे. नावेली येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येथे नियमितपणे टाकी रिकामी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ओल्या कचऱयावर दररोज आवश्यक जैवऔषधाची फवारणी केली पाहिजे. कारण विघटन प्रक्रिया वाढण्याची गरज आहे. विद्यमान डंपजवळील जुनी व खराब झालेली शेड नीट करायला हवी. जेणेकरून त्या क्षेत्राचा वापर घनकचरा व्यवस्थापनासाठी करता येईल, असे अहवालात म्हटले आहे.
सुक्या कचऱयावर पालिकेने प्रक्रिया करावी
लँडफिलभोवती टाकलेला सुका कचरा हटविला जावा. सुक्या कचऱयावर पालिकेने प्रक्रिया करावी. दररोज सुका कचरा फेरवापर करण्यायोग्य आणि न करण्यायोग्य असा वेगळा केला पाहिजे, अशा सूचना अहवालात करण्यात आल्या आहेत. विंडो कंपोस्टिंगद्वारे सुमारे 20 टन ओला कचरा हाताळण्यास विद्यमान शेड पुरेशी आहे. दररोज 15 टन ओल्या कचऱयावर प्रक्रिया करणे शक्मय होत नसते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
अवघ्याच कचऱयाचे बेलिंग
शेडच्या पहिल्या मजल्यावरील जागा सध्या बेलिंगसाठी वापरली जाते. जागेची मर्यादा असल्यामुळे केवळ दोन बेलिंग यंत्रे येथे सामावून घेतली जाऊ शकतात. या दोन बेलिंग मशिनद्वारे दिवसाला केवळ 3 ते 4 टन कचऱयाचे बेलिंग होत आहे, याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यात आले आहे. शेडच्या बाहेर अतिरिक्त दोन बेलिंग यंत्रे आहेत. त्यावर शेड नसल्याने ती उघडय़ावर असून बंद आहेत. तसेच एसजीपीडीए मार्केटमध्ये दोन आणि पालिका इमारतीच्या मागील भागात दोन बेलिंग यंत्रे असून ती बंद असल्याने येथे बेलिंग होत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आठपैकी सहा बेलिंग यंत्रे बंद
एकूण आठ बेलिंग यंत्रे आहेत. त्यापैकी सहा नादुरुस्त व बंद आहेत. ही यंत्रे उपयोगात नसल्याने दैनंदिन गोळा होणाऱया 25 टन सुक्या कचऱयापैकी फक्त 3 टन कचऱयाचेच बेलिंग होत आहे आणि शिल्लक 20 ते 22 टन पडून राहत आहे. तसेच सुक्या कचऱयातून फेरवापर करण्यायोग्य व न करण्याजोगा असा कचरा वेगळा करण्याची प्रणाली कार्यरत नसल्यावर अहवालात बोट ठेवण्यात आले आहे. सुक्या कचऱयाची विद्यमान व्यवस्था पाहिल्यास केवळ 3 ते 4 टन कचऱया बेलिंग होत असून घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 नुसार काम होत नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.









