प्रतिनिधी / मडगाव
मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 25 प्रभागातून एकूण 131 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्जाची छाननी व उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसानंतर मडगाव पालिकेचे एकूण चित्र स्पष्ट होणार आहे. काल उमेदवारी दाखल करणाऱयामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक दामोदर नाईक तसेच वायंब्रट मडगाव पॅनलचे उमेदवार सुनील कृष्णनाथ नाईक व माजी आमदार लुईस आलेक्स कार्दोज यांची कन्या व्हिव्हियाना कार्दोज यांचा समावेश होता.
दरम्यान, काँग्रेस पुरस्कृत मॉडेल मडगाव पॅनल व गोवा फॉरवर्ड पॅनल यांनी युती केली असली तरी फातोर्डा मतदारसंघातून अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणुकींच्या रिंगणात उतरले आहेत. नगरपालिकेची निवडणूक ही पक्षीय पातळीवर होत नसल्याने आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असल्याचे या उमेदवारांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपचे आव्हान
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रभागात प्रचार करताना आमदारांना आपल्या सोबत न आणता प्रचार करावा व निवडणूक जिंकून दाखवावी असे जाहीर आव्हान मडगाव भाजप मंडळा तर्फे देण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसोबत फिरण्यासाठी कार्यकर्ते देखील नाही अशा परिस्थितीत ते निवडणूक कशी जिंकणार असा सवाल देखील मंडळ अध्यक्ष रूपेश महात्मे यांनी उपस्थितीत केला आहे.
वायंब्रट मडगाव पॅनलचे मडगाव मतदारसंघातून आठ ते णऊ उमेदवार नक्कीच विजयी होतील असा दावा त्यांनी केला आहे. वायंब्रट मडगाव पॅनलमधील उमेदवारांना निवडून देऊन मडगावचा विकास करण्याची संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गेली दहा वर्षे मडगाव पालिकेवर काँग्रेस व गोवा फॉरवर्डची सत्ता होती. मात्र, त्यांना मडगाव व फातोडर्य़ाचा विकास साधण्यात अपयश आल्याची टीका ही श्री. महात्मे यांनी केली.
आपण अपक्ष उमेदवार
आरक्षणामुळे आपल्याला प्रभाग बदलणे भाग पडले आहे. पूर्वी आपण मॉडेल मडगाव पॅनलमधून उमेदवारी अर्ज भरला होता. पण, नंतर आरक्षणामुळे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने आपल्याला प्रभाग बदलणे भाग पडल्याची माहिती माजी नगरसेवक दामोदर नाईक यांनी दिली. आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रभाग बदलण्यास सांगितल्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही. आपण अपक्ष असून आपले मतदार हेच आपले पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितले.









