पालिका मंडळाच्या बैठकीत ई-निविदा काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, पालिका संचालकांच्या निर्देशाला वाटाण्याच्या अक्षता, कामे सुरू होण्यास तीन आठवडे तरी लागणार
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेने बुधवारी सकाळी पालिका मंडळाची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी ई-निविदा काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. मात्र ही सर्व प्रक्रिया मार्गी लागून कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होण्यासाठी तीन आठवडे तरी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
पालिका संचालक तारिक थॉमस यांनी 15 व्या वित्त आयोगाकडून मडगाव पालिकेला मिळालेल्या निधीतील 15 लाख रुपये वापरण्यास मंजुरी दिली होती. रोजंदारीवरील कामगार घेऊन त्वरित मान्सूनपूर्व कामे हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. मात्र पालिकेने संचालकांच्या निर्देशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे बुधवारच्या मंडळाच्या बैठकीतील निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे.
एकंदर 3 लाखांच्या आठ निविदा काढून ही मान्सूनपूर्व कामे करण्यात येणार आहेत. उर्वरित 9 लाख पालिकेच्या निधीतून वापरले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. जास्त करून प्रभागांतील गटारे तसेच काही ठिकाणी नाले उपसण्याच्या कामांचा या मान्सूनपूर्व कामांसाठी काढण्यात येणाऱया निविदांमध्ये समावेश राहणार आहे. एकूण तीन प्रभागांत मिळून 3 लाखांची कामे करण्यासाठी या विविध निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, सदर मान्सूनपूर्व कामांच्या निविदा ऑनलाईन काढणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी पालिकेने माहिती खात्याच्या कर्मचाऱयाशी संपक साधला असून सदर कर्मचाऱयाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निविदा काढणे शक्मय होणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.









