नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून सर्व प्रभागांतील गटारे व नाले उपसण्यासाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. तीन प्रभागांत मिळून 3 लाखांची कामे करण्यासाठी विविध निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या सूत्रांनी दिली.
या मान्सूनपूर्व कामांसाठी काढण्यात येणाऱया निविदांमध्ये जास्त करून प्रभागांतील गटारांच्या सफाईच्या तसेच काही ठिकाणी नाले उपसण्याच्या कामांचा समावेश आहे. मडगाव पालिका क्षेत्रात मडगाव व फातोर्डा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 11 व कुडतरी मतदारसंघातील 3 प्रभागांचा समावेश होतो. सध्या सदर निविदा काढण्यासाठीचे सर्व सोपस्कार पालिकेच्या तांत्रिक विभागाने पूर्ण केले असल्याची माहिती नगराध्यक्षा नाईक यांनी दिली.
सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेत कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात आहे. मात्र पालिका अभियंता दिनीज डिमेलो यांनी खास लक्ष घालून व अन्य अभियंत्यांचे सहकार्य घेऊन निविदांसाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याचे नगराध्यक्षांनी नजरेस आणून दिले. दरम्यान, सदर मान्सूनपूर्व कामांच्या निविदा ऑनलाईन काढणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी पालिकेने माहिती खात्याच्या कर्मचाऱयाशी संपर्क साधला असून सदर कर्मचाऱयाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निविदा काढणे शक्य होणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.