प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची आठवडाभरापूर्वी तडकाफडकी बदली करताना जॉन्सन फर्नांडिस यांच्याकडे अतिरिक्त ताबा देण्यात आला होता. मात्र जॉन्सन फर्नांडिस सदर अतिरिक्त ताबा घेण्यास इच्छुक नसल्याने आग्नेल फर्नांडिस यांची बदली रद्द झाली असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
जॉन्सन फर्नांडिस यांनी ताबा न घेतल्याने तसेच आग्नेल फर्नांडिस हेच सध्या मडगाव पालिकेचे कामकाज हाताळत असल्याने बदली रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. अधिकृतरीत्या अजूनही आवश्यक आदेशवजा पत्रव्यवहार झालेला नसला, तरी यासंदर्भात मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी बदली रद्द झाल्यातच जमा असल्याचे सांगितले.
जवळपास 5 महिन्यांपूर्वी आग्नेल फर्नांडिस यांनी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतला होता. त्यांना पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून ताबा देण्यात आला होता, तर जॉन्सन फर्नांडिस हे ‘सेटलमेंट अँड लँड रिकॉर्ड्स’ खात्याचे संचालक असून त्यांच्याकडे अतिरिक्त ताबा देण्यात आला होता. बदली करताना आग्नेल फर्नांडिस यांच्याकडे गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाचे खास अधिकारी (एसएलएओ) म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.
आग्नेल फर्नांडिस यांनी आपल्या मुख्याधिकारीपदाच्या कार्यकाळात चांगली कामगिरी केली आहे. पालिका क्षेत्रातील कचरा समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले आहेत. ज्ये÷ नागरिक तसेच दिव्यांगांची कामे तत्परतेने होतील याकडे त्यांचा कटाक्ष राहिला आहे. दिव्यांगांकरिता पालिका इमारतीमध्ये खास सुविधा तयार करून घेण्यासाठी तसेच प्रभागवार सार्वजनिक प्रसाधनगृहांत दिव्यांगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काही निर्णय घेतले होते. त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची प्रतिक्रिया काही मावळत्या नगरसेवकांनी व्यक्त केली होती. मडगाव पालिका ‘अ’ वर्गात येत असून येथे कामाचा व्याप मोठा असतो. त्यामुळे आग्नेल फर्नांडिस यांच्याप्रमाणे पूर्णवेळ मुख्याधिकारी असणे आवश्यक असून जॉन्सन फर्नांडिस यांच्याकडे अतिरिक्त ताबा देण्यात आल्याने पालिकेतील आपल्या कामांना ते न्याय देऊ शकतील काय अशी शंका व्यक्त होऊ लागली होती. कारण यापूर्वी अतिरिक्त ताबा असलेल्या मुख्याधिकाऱयांमुळे पालिकेची प्रशासकीय कामे खोळंबून सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसल्याचे दिसून आलेले आहे.









