अंमलीपदार्थ विरोधी पथकाची कारवाई , कोंब, खारेबांध, माजोर्डा येथे छापेमारी
प्रतिनिधी/ पणजी
अमलीपदार्थ विरोधी विभागाने मडगाव परिसरात तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत 13 लाख 62 हजार रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी तिघांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितांना आज बुधवारी रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये मुहाफिज पठाण (22 वर्षे, खारेबांध मडगाव), मिल्लेन पिल्लाई (22 वर्षे, मार्जोडा मूळ ओडिशा), विनायक झुवारकर (22 वर्षे, मडगाव) यांचा समावेश आहे. या कारवाया 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून 17 रोजी पहाटेपर्यंत करण्यात आल्या.
पाडव्याच्या रात्री सुरु झाली छापेमारी
मडगाव परिसरात मोठय़ाप्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी साऱया प्रकाराचे नियोजन करून पाडव्याच्या रात्रीच मडगाव परिसरात धाडसत्र सुरु केले.
खारेबांधच्या छाप्यात 1.31 लाखाचा गांजा जप्त
उपनिरीक्षक प्रियांका सावंत यांच्या नेतृत्वाखाली खारेबांध येथे पहिला छापा मारण्यात आला. येथे मुहाफिज पठाण याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 लाख 31 हजार रुपये किमंतीचा 1 किलो 330 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. त्याची कसून उलट तपासणी केली असता आणखी काही संशयितांची नावे उघड झाली.
माजोर्डाच्या छाप्यात 10.31 लाखांचा गांजा जप्त
पोलिसांनी अटक केलेल्या मुहाफिज पठाण याला सोबत घेऊनच माजोर्डा गाठले. त्याठिकाणी मिल्लेन पिल्लई याला अटक केली. त्याच्याकडून 10 लाख 31 हजार रुपये किमंतीचा 10 किलो 310 ग्राम गांजा जप्त केला. ही कारवाई उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती.
कोंब येथील छाप्यात 2 लाखाचा गांजा जप्त
दोन्ही संशियांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कोंब मडगाव येथे छापा मारून संशयित विनायक झुवारकर याला अटक केली. त्याच्याकडून 2 लाख रुपये किमंताची दोन किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई रोहन मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती.









