रुग्णवाहिकाही अडकून पडण्याचे प्रकार तर झुवारी पुलावरील वाहतूक बंद पाडूः काँग्रेस
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव-पणजी महामार्गावरील वाहतुकीचे सध्या तीन-तेरा वाजले असून गेले काही दिवस हा प्रकार सुरू आहे. नव्या झुवारी पुलाचे काम सुरू असून त्याचा परिणाम सध्या वाहतुकीवर होत आहे. झुवारी पुलाच्या दोन्ही बाजूनी सध्या वाहनांच्या मोठय़ा रांगा लागत असून तासंन तास वाहतुकीची कोंडी सुटत नाही. त्यामुळे मडगाव ते पणजी व पणजी ते मडगाव असा प्रवास करणे मोठी डोकेदुखी ठरली आहे.
बहुसंख्य पर्यटक घेऊन येतात वाहने
गोव्यात सध्या मोठय़ा प्रमाणात पर्यटक दाखल झाले असून बहुसंख्य पर्यटक हे आपली स्वतःची वाहने घेऊन आल्याने मडगाव-पणजी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. सध्या झुवारी पुलाच्या दोन्ही बाजूनी वाहनांची केंडी होत असल्याने त्यात रुग्णवाहिका देखील अडकून पडण्याचे प्रकार घडू लागले आहे. रुग्णांना वेळीच गोमेकॉत पोचविणेसुद्धा शक्य होत नाही. गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना गोमेकॉत पाठवून दिले जात असले तरी या वाहनांच्या कोंडीत अडकून पडत असल्याने रुग्ण वाटेत दगावण्याची शक्यता देखील नाकारली जात नाही.
वाहतूक पोलीस अपयशी
गेले काही दिवस मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली असून त्यावर उपाय काढण्यास वाहतूक पोलीस अपयशी ठरले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी नाक्यावर वाहतूक पोलीस तैनात करून वाहतूक कोंडी सोडविली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, वाहतूक पोलीस ही कोंडी दूर करण्यास अपयशी ठरले आहेत.
त्वरित उपाययोजना आखा
उत्तर गोव्यातून अनेक प्रवासी हे दाबोळी विमानतळावर जाणारे असतात. मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्यांना विमान चुकण्याचे प्रकार देखील घडू लागले आहेत. काहीजण रेल्वे पकडण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकावर येत असतात, त्याची सुद्धा गैरसोय होऊ लागली आहे. सरकारने या वाहतूक कोंडीवर त्वरित उपाययोजना आखावी, अशी मागणी पणजी-मडगाव, मडगाव-पणजी या मार्गावर प्रवास करणाऱया प्रवाशांकडून होत आहे.
वाहनचालकांच्या संयमाचा अंत पाहू नका : काँग्रेस
दरम्यान, काँग्रेस पक्षाने ही वाहतूक कोंडी सोडविण्यास सरकारला मुदत दिली असून या मुदतीच्या आत जर वाहतूक कोंडी दूर केली नाही तर झुवारी पुलावरील वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने वाहन चालकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे.









