आमदार दिगंबर कामत यांच्या निर्देशानुसार उमेदवारी : शिरोडकर, फातोर्डा फॉरवर्डच्या नगरसेवकांचा घनश्याम शिरोडकरांना पाठिंबा, आज थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी बुधवारी भाजपात प्रवेश केलेल्या आमदार दिगंबर कामत गटातील नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आमदार कामत यांच्या निर्देशानुसार आपण उमेदवारी दाखल केल्याचे शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपाच्या वतीने नगरसेवक सदानंद नाईक यांनी अर्ज दाखल केला आहे याकडे शिरोडकर यांचे लक्ष वेधले असता यासंदर्भात काय तो निर्णय नेते घेतील, असे उत्तर त्यांनी दिले. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, असे ते म्हणाले.
शिरोडकर यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. त्यांना नगरसेवक दामोदर वरक, सेण्ड्रा फर्नांडिस आणि लता पेडणेकर यांनी अनुमोदन दिले आहे. दरम्यान, स्वतंत्र नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी गुरुवारी अतिरिक्त दोन अर्ज दाखल केले आहेत. फातोर्डा फॉरवर्डचे नगरसेवक राजू नाईक व व्हितोरिनो तावारीस यांनी त्यांना अनुमोदन दिले आहे. शिरोडकर यांचे एकूण पाच अर्ज झाले आहेत.
भाजपाच्या गटातील मूळचे 9 नगरसेवक तसेच आमदार कामत गटातील 7 नगरसेवक निळून भाजपाचे एकूण 16 नगरसेवकांचे संख्याबळ झाले आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी 13 नगरसेवक पुरेसे आहेत. मात्र भाजपाला दामोदर शिरोडकर आणि सदानंद नाईक यांच्यातील एकाला माघार घेण्यास भाग पाडावे लागणार आहे.
फातोर्डा फॉरवर्ड घनश्याम शिरोडकरांच्या मागे
दुसरीकडे, फातोर्डा फॉरवर्डचे 8 नगरसेवक एकसंध राहून घनश्याम शिरोडकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार हे जवळजवळ निश्चित आहे. शिरोडकर यांना आणखी 4 नगरसेवकांची गरज आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपाच्या कामिलो बार्रेटो, सुनीता पराडकर आणि महेश आमोणकर यांनी अनुमोदन दिले होते. मात्र बुधवारच्या राजकीय घडामोडी व कामत यांचा भाजपा प्रवेश यामुळे समीकरणे बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर घनश्याम शिरोडकर यांना अनुमोदन दिलेले तीन भाजप नगरसेवक त्यांच्यामागे राहतील की, भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करतील हे पाहावे लागणार आहे. गुप्त मतदान असल्याने क्रॉस व्होटिंगची शक्यता वर्तविली जात आहे.
सदानंद नाईक यांच्या बाजूने व्यक्त झाला होता सूर
बुधवारी भाजप नेते ऍड. नरेंद्र सावईकर, रुपेश महात्मे, शर्मद रायतूरकर, दामू नाईक यांच्यासहित भाजप नगरसेवकांची बैठक झाली होती. त्यात कामत गटातील नगरसेवक उपस्थित नव्हते. यावेळी सदानंद नाईक यांनी आपण अर्ज भरला असला, तरी नेते सांगणार तो निर्णय घेणार असल्याचे बोलून दाखविले. मात्र शर्मद रायतूरकर यांनी सदानंद नाईक हे ज्येष्ठ नगरसेवक व भाजप पॅनलमधून निवडून आलेले असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची आवश्यकता बोलून दाखविली होती. अन्य काही नगरसेवक याच मताचे होते.
कामत यांनी भाजप प्रवेश केला असला, तरी त्यांच्या गटातील नगरसेवकांनी प्रवेश केला नसल्याचा सूरही भाजप गटातील काही नगरसेवक व्यक्त करत आहेत. कामत यांच्या प्रवेशाच्या आधी मूळ भाजप गट 9 सदस्यांचा होता. त्यामुळे कामत यांच्या गटापेक्षा हा गट मोठा असल्याने या गटातील नगरसेवकाला उमेदवारी मिळायला हवी, असे मत व्यक्त केले जात आहे.









