बहुतांश लोकांची जन्मदाखल्यांसाठी धाव, मात्र पदरी निराशा, 3 पर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे
प्रतिनिधी / मडगाव
लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून शिथीलता आणताना सरकारी कार्यालये खुली राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर मडगाव पालिकेत लोकांनी गर्दी केली. बहुतांश लोक जन्मदाखले मिळविण्यासाठी आलेले असले, तरी त्यांच्या हाती काही दाखले पडले नाहीत. नगराध्यक्षा जे सांगतात ते ऐकले, तर 3 मेपर्यंत लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा लोकांना करावी लागणार असे एकूण कारभारावरून दिसून येते.
सोशल डिस्टन्सिंचे पालन करून पालिकेला जन्म तसेच मृत्यूचे दाखले द्यावे लागणार आहेत. सध्या पालिकेत कर्मचाऱयांची कमतरता आहे. त्यात पालिका कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे दाखले मिळविण्यासाठी पालिकेच्या आवारात रांग लावलेल्यांच्या पदरी मागील दोन दिवसांत निराशाच पडली आहे.
पालिकेत कोणालाही उगाच प्रवेश दिला जात नसून तेथे तैनात सुरक्षा रक्षकाकडून कोणत्या कामानिमित्त भेट आहे हे विचारण्यात येते. भेटीला परवानगी द्यायचे ठरल्यास सेनिटायजरने हात निर्जंतूक करण्यास सांगितले जाते व थर्मल गनच्या आधारे तापमान तपासले जाते असे दिसून येते.
मुख्याधिकारी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पुढील काही दिवसांत जन्म व मृत्यूचे दाखले पुरविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे म्हणत असले, तरी नगराध्यक्षा मात्र या सर्व बाबींवर 3 मेनंतरच काय तो निर्णय घेणे शक्मय असल्याचे सांगताना आढळतात. सध्या नवीन जन्मनोंदणीसाठी जे अर्ज येतात ते नोंदणीकृत करण्याचे निर्देश नगराध्यक्षा पूजा नाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना दिले आहेत.
ऑनलाईन अर्जाची व्यवस्था
सरकारने बांधकाम प्रकल्प सुरू करण्यासाठी तसेच काही प्रकारचे व्यापार करण्यास मुभा दिली आहे. त्यासाठी परवानगी मिळविण्याकरिताही पालिकेस लोक भेट देत आहेत. मात्र यासाठी पालिकेने ई-मेल तयार केला असून त्यावर ऑनलाईन अर्ज इच्छुकांना करावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगराध्यक्षांकडून अनौपचारिक बैठक
दरम्यान, सोमवारी पालिकेच्या काही नगरसेवकांना घेऊन नगराध्यक्षांनी एक अनौपचारिक बैठक घेतली. त्यात लवकरच पालिका मंडळाची बैठक घेऊन अंदाजपत्रकाला मंजुरी घेण्याचे तसेच घरपट्टीचा भरणा करण्यासाठी काही काळ सूट देण्याचे आणि एका सेनिटरी निरीक्षकाला गैरवर्तनाबद्दल मेमो जारी करण्यास मुख्याधिकाऱयांना सांगण्याचे ठरविण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.









