प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हतबल झालेल्या राज्य सरकारने मडगावच्या सुमारे 400 ते 500 खाटांच्या क्षमतेच्या संपूर्ण जिल्हा इस्पितळाचे कोविड इस्पितळात रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा करून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हा निर्णय सायंकाळी जाहीर केला. सध्या राज्यात मडगावचे इस्पितळ तसेच फोंडा येथील इस्पितळ कोविड रुग्णांची काळजी घेण्यासाठी दोन इस्पितळे आहेत. मडगावच्या जिल्हा इस्पितळातदेखील कोविडसाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने त्याचबरोबर इस्पितळातील खाटा कमी पडत असल्यामुळे रुग्णांचे होत असलेले हाल, यामुळे अखेर सरकारला जाग आली असून सायंकाळी आरोग्यमंत्र्यांनी एका संदेशाद्वारे मडगावचे संपूर्ण 500 खाटांचे जिल्हा इस्पितळ हे कोविड इस्पितळ म्हणून जाहीर केले.
या इस्पितळाची जबाबदारी डॉ. सुनंदा आमोणकर आणि डॉ. राजेश पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गोमेकॉच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपा कोरीय्या यांच्या मार्गदर्शनाखाली हे इस्पितळ पूर्णत: कोविडसाठी राखीव करण्यात आले.
दै. तरुण भारतने रविवारी राज्यातील इस्पितळात कोरोना रुग्णांचे होणारे हाल तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व वॉर्ड कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. रुग्णांची जमिनीवर केलेल्या व्यवस्थेची छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली होती. या वरून गोव्यातील हे विदारक दृष्य सर्वांना समजले.









