प्रतिनिधी / मडगाव
मडगावातील गांधी मार्केटमध्ये रविवारी सकाळी लोकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. मात्र यावेळी सीआयएफएसचे जवान व पोलिसांनी लोकांना हाकलून लावले. त्यानंतर हा बाजार बंद करण्यात आला. मागील चार-पाच दिवसांपेक्षा रविवारी कमी गर्दा दिसून आली.
शनिवारी गांधी मार्केटात फळ-भाज्यांचे ट्रक आले होते. रविवारी असे ट्रक आले नव्हते. शनिवारी लोकांकडून गर्दी करून अंतर राखले जात नसल्याने दुकाने बंद करण्यास सांगितल्याने फळ-भाज्या शिल्लक राहून गेल्या होत्या. त्यांची रविवारी काही प्रमाणात विक्री करण्यात आल्याचे एका फळ-भाजीविक्रेत्याने सांगितले.
अनेक भुसारी दुकाने बंदच
लोकांची गर्दी झाल्याने पोलिसांकडून दुकाने बंद पाडण्यात आली व लोकांना गांधी मार्केटमधून बाहेर काढल्यानंतर येथे शुकशुकाट पसरला. मडगावातील न्यू मार्केट बंदच ठेवण्यात आले होते. भुसारी व फळ-भाज्यांची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी असली, तरी माल उपलब्ध नसल्याने कित्येक किरकोळ विक्रीची भुसारी दुकाने बंदच आहेत. तुरळक भुसारी दुकाने उपलब्ध असलेले साहित्य देताना आढळतात.
बाजारात दाटीवाटीने दुकाने असल्याने अडचण
गांधी मार्केट व न्यू मार्केटमध्ये फळ-भाजी व किराणामालाच्या वस्तूंची विक्री करण्यास मनाई नाही. मात्र पालिकेच्या मालकीच्या या दोन्ही बाजारांमध्ये दाटीदाटीने गाळे असल्याने आवश्यक अंतर ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे हे बाजार बंद ठेवावे लागत असल्याचे दिसून येते. गांधी मार्केट विक्रेते संघटनेचे राजेंद्र आजगावकर यांनी पोलीस निरीक्षकांना घेऊन पाहणी करताना ग्राहकांना आंत सोडण्यासाठी अन्य सर्व मार्ग बंद करून एकच मार्ग खुला करण्याचे व रांगेत उभे करून ग्राहकांना बाजारात प्रवेश देण्याचे ठरविले होते. मात्र ते प्रत्यक्षात उतरू शकलेले नाही. त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.
पुरवठय़ाअभावी मार्केट बंदच राहण्याचे संकेत
शनिवारी गांधी मार्केटमध्ये फळ-भाज्यांचे ट्रक आले होते. पुढील आठवडाभर असे ट्रक येणार नसल्याचे माहिती विक्रेते संघटनेच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळे हा बाजार बंदच राहण्याचे संकेत मिळत असून सीआयएफएस जवानांचा या भागात रविवारपासून पहारा ठेवण्यात आल्याने लोकांना फिरकणे शक्य होणार नसल्याचे दिसून येते.
सरकारी घोषणेनुरूप हालचाली नाहीत
मडगावात आकें येथे कपेलजवळ फळभाज्यांची विक्री करण्यात येत होती तसेच अन्य काही भागांमध्ये फळ-भाजीविक्री केली जात होती. काहींनी स्वत:हून पुढाकार घेऊन फळे घरपोच देण्याची सोय केल्याचे दिसून आले. मात्र सरकारकडून स्थानिक आमदार, नगरसेवक व स्वयंसेवक मिळून जीवनाश्यक वस्तू घरपोच करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासंदर्भात कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत.