कारवार तालुकावासियांतून समाधान : 20 महिन्यांपासून होती स्थगिती : रेल्वेसेवेचा दर्जा उंचावण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी /कारवार
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले उणेपुरे 20 महिने स्थगित करण्यात आलेली मडगाव-कारवार (डीएमयू पॅसेंजर) दरम्यानची रेल्वेसेवा सोमवारी मडगावहून सुरू करण्यात आली. परिणामी कारवार तालुकावासियांनी समाधान व्यक्त केले असून रोजगार, व्यवसाय किंवा अन्य कारणासाठी प्रत्येक दिवशी गोव्याला ये-जा करणाऱया प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही वर्षांपासून ही रेल्वेसेवा कार्यरत आहे. प्रत्येक दिवशी सकाळी सहा वाजता कारवार रेल्वेस्थानकावरून निघणारी ही रेल्वे सात-साडेसात वाजेपर्यंत मडगाव रेल्वेस्थानकात दाखल होते. संध्याकाळी 7 वाजून दहा मिनिटांनी मडगाव रेल्वेस्थानकावरून निघणारी ही रेल्वे कारवारला रात्री 8 ते साडेआठ वाजेपर्यंत पोहोचते.
या रेल्वेचे कारवार आणि असनोटी असे दोन थांबे कारवार तालुक्मयात आहेत. या दोन रेल्वेस्थानकावरून कारवार, सिद्दर, किन्नर, कडवाड, सदाशिवगड, माजाळी, मुडगेरी, हणकोण, असनोटी आदी गावातील सुमारे 700 ते 800 नागरिक प्रत्येक दिवशी गोव्याला ये-जा करीत असतात. यामध्ये रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने गोव्याला ये-जा करणाऱयांचा भरणा अधिक आहे.
या व्यतिरिक्त मडगाव आणि गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी ये-जा करणाऱयांची संख्याही बऱयापैकी आहे. ही रेल्वेसेवा केवळ कारवार तालुकावासियांसाठी इतकीच नव्हे तर दक्षिण गोव्यातील विशेष करून काणकोण तालुकावासियांसाठी उपयुक्त बनून राहिली होती. तथापि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही रेल्वेसेवा गेल्या 20 महिन्यांपासून स्थगित केली होती. याचा फार मोठा फटका रोजगाराच्या निमित्ताने गोव्याला ये-जा करणाऱया कारवार तालुकावासियांना बसला होता.
नोकरीला ठोकला रामराम
रेल्वे बंद असल्याने गोव्याला जाणे शक्मय नसल्याने कारवार तालुक्मयातील काही युवक-युवतींनी नोकरीला रामराम ठोकला होता. कारण त्यांना अधिक पैसे मोजून बसने ये-जा करणे शक्मय नव्हते. कमी वेतनात सेवा बजावणाऱया येथील अनेकांना गोव्यातील नोकरीच्या ठिकाणी इतर सुविधाही कोरोना निर्बंधांमुळे उपलब्ध नव्हत्या. तर अन्य काही युवक आणि युवतींनी गोव्यात भाडोत्री घरात वास्तव्य करून नोकरी टिकवून ठेवली होती.
काहींना भाडय़ाचे दर परवडणारे नसले तरी नोकरीसाठी मोठी कसरत करावी लागली होती. सोमवारी मडगावपासून रेल्वेसेवेला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते.
कारवार-मडगाव दरम्यानची रेल्वेसेवा पूर्ववत होणे ही दिलासादायक बाब आहे. यामुळे कारवार तालुक्मयातील अनेक जण सुखावले आहेत. त्याचबरोबर रेल्वेसेवेतही सुधारणा झाली पाहिजे. रेल्वे उशिरा धावल्याने नोकरीला जाणाऱयांना अनेकवेळा फटका बसला आहे. रेल्वेच्या बोगींच्या संख्येत वाढ केली पाहिजे. जेणेकरून गर्दी टाळता येईल, अशी प्रतिक्रिया गावगेरी-माजाळी येथील प्रशांत सोमण्णा पवार यांनी व्यक्त केली.









