उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्या बहिणीने उभारलेला बेकायदा गाडा, राजकीय दबावामुळे पोलिसांकडून संरक्षण देण्यास टाळाटाळ : नगराध्यक्षांचा आरोप
प्रतिनिधी /मडगाव
मडगावातील कदंब बसस्थानकाच्या नजीक रातोरात एक बेकायदा गाडा उभारण्यात आला आहे. सदर गाडय़ावर कारवाई करण्यासाठी पालिकेने पथक तयार ठेवले असले, तरी फातोर्डा पोलीस संरक्षण देण्यास टाळाटाळ करत असल्याने कारवाई करण्यात विलंब होत असल्याचा दावा नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या बहिणीने हा बेकायदा गाडा उभारला असून राजकीय दबाव असल्याने पोलीस संरक्षण देण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येते, असा दावा नगराध्यक्षांनी पत्रकारांशी बोलताना केला.
कदंब बसस्थानकाच्या नजीक हा गाडा अन्यत्र तयार करून दोन दिवसांपूर्वी रातोरात बसविण्यात आला. हा प्रकार नजरेस आल्यानंतर स्थानिक नगरसेवक जॉनी क्रास्टो यांनी आपल्याकडे तक्रार केली. आपण मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना आवश्यक कारवाई करण्यास सांगितले असता सोमवारी सायंकाळी त्यांनी कारवाईचा आदेश जारी केला व पोलीस संरक्षणासाठी फातोर्डा पोलिसांकडे संपर्क साधला. मात्र पोलिसांनी सहकार्य केले नाही, असे नगराध्यक्ष पेरेरा यांनी सांगितले.
आजगावकर यांच्या दबावामुळे पोलिसांचे असहकार्य
गुरुवारी सकाळी कारवाईसाठी जेसीबी, ट्रक, कामगार, मार्केट निरीक्षक व अभियंता तयार होते. मात्र पोलिसांकडून पुन्हा सहकार्य न मिळाल्याने कारवाई होऊ शकली नाही. उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्या दबावामुळे पोलीस सहकार्य करत नसून मडगाव पालिका बेकायदा बाबींवर कारवाईसाठी पुढाकार घेत असली, तरी भाजप सरकार त्यास संरक्षण देऊन खतपाणी घालत आहे, अशी टीका पेरेरा यांनी केली.
कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार
आजगावकर फातोर्डातील कदंब बसस्थानक परिसर गांधी मार्केट करू पाहत असून हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आपल्याकडे बहुतेक नगरसेवकांनी संपर्क साधला असून वरील बेकायदा गाडय़ावर कारवाई न झाल्यास त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये असे बेकायदा गाडे उभारण्याचा इशारा दिला आहे, असे नगराध्यक्ष पेरेरा यांनी सांगितले. सदर बेकायदा गाडय़ावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चूक झालेली असल्यास वेळ द्या
सदर बेकायदा गाडा उभारलेल्या कोटे यांच्याकडून या जागी आपले एक ‘बॉक्स’ होते, असा दावा करण्यात येत आहे. चक्क लोखंड वापरून पक्के बांधकाम कसे केले अशी विचारणा केली असता, आमची चूक झालेली असल्यास 15 दिवसांचा वेळ देण्यात यावा, आम्ही आवश्यक प्रक्रिया करू, अशा प्रकारे बाजू मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला
अन्य बेकायदा गाडय़ांवरही कारवाईची मागणी
सदर गाडा आपल्या नातलगाचा असल्याचे उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी मान्य केले आहे. पण सदर ठिकाणी अन्य बेकायदा गाडे असून पालिकेने सर्वेक्षण करून त्या अन्य बेकायदा गाडय़ांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी उचलून धरली आहे. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी सात दिवसांत यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गाडा लगेच स्वतःहून काढण्यास सांगणार : आजगावकर
सायंकाळी उशिरा पुन्हा प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी आपण उद्या आपल्या नातलगाला सदर गाडा स्वतःहून काढण्यास सांगणार असल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्ष पेरेरा गांधी मार्केटमध्ये बेकायदा बाबी असल्याचे सांगत आहेत. त्यांनी अशा बेकायदा बाबींवर जरूर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.









