प्रतिनिधी / मडगाव
दोन किलो गांजा घेऊन मडगावात आलेल्या एका 26 वर्षीय आरोपीला फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 2 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार अमूक वेळी असलेला एक युवक मडगावच्या कदंब बस स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार श्री. नायक यांनी आपल्या सहकाऱयांना मार्गदर्शन केले आणि साध्या कपडय़ातील पोलीस कर्मचारी मडगावच्या कदंब बसस्थानकावर पेरण्यात आले.
पोलिसांना मिळालेल्या वर्णनाला जुळेल असा एक युवक येत असल्याचे साध्या कपडय़ातील पोलिसांना दिसले तेव्हा त्या संशयिताला पोलिसानी हटकले. समाधानकारकरित्या उत्तरे देऊ शकला नाही तेव्हा त्याची तपासणी करण्यात आले. त्याच्याकडे दोन किलो वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ सापडला. बाजारात या पदार्थाची किंमत अंदाजे 2 लाख रुपये इतकी असेल.
या संशयित आरोपीचे नाव मंतेश नेवरगी (26) असे असून जुवारीनगरातील हनुमान मंदिराजवळ सदर युवक राहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संशयित आरोपीला फातोर्डा पोलीस स्थानकावर आणून त्याची आणखी सखोल चौकशी चालू करण्यात आली आहे. या चौकशीत हा गांजासदृश्य पदार्थ कोठून आणला यासारखी माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. अमली पदार्थविरोधी कायद्याच्या विविध कलमाखाली या आरोपीला फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्वेश भंडारी, हवालदार निलेश कासकर, हवालदार महेंद्र गावडे यांनी ही कारवाई केली.









