यंदा पारंपरिक कार्निव्हलला प्राधान्य
प्रतिनिधी /मडगाव
मडगावात रविवार दि. 27 रोजी कार्निव्हल मिरवणूक निघणार असल्याची माहिती मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी तथा कार्निव्हल समितीचे अध्यक्ष आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा पारंपरिक कार्निव्हल (‘इत्रुज’ला) प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्निव्हल मिरवणूक कोविड नियमाचे पालन करून साजरी होणार असल्याचे सांगण्यात आले.
गोव्याची लोकपरंपरा व गोव्याच्या मातीतील लोककलेचे जतन व संवर्धन व्हायला पाहिजे. आज गोव्याच्या मातीतील लोककला लोप पावत आहे. जर त्यांचे जतन व संधर्वन झाले नाही तर भावीपिढी साठी आम्ही काहीच शिल्लक ठेऊ शकणार नाही. त्यामुळे यंदाच्या कार्निव्हलमध्ये पारंपरिक इत्रुजला प्राधान्य दिले जाईल. पूर्वी गावागावांतून खेळ व्हायचे, लोक त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायचे असे आग्नेल फर्नांडिस म्हणाले.
27 रोजी निघणाऱया कार्निव्हल मिरवणुकीसाठी इच्छुकांकडून प्रवेशिका स्वीकारण्यास प्रारंभ झालेला आहे. गोव्यातील सर्व पथकांनी त्यात सहभागी व्हावे व कार्निव्हल मिरवणूक यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. कार्निव्हल मिरवणूक दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालय ते बोरकर सुपर स्टोअर फातोर्डा पर्यंत निघणार आहे. यावेळी कार्निव्हल समितीचे सचिव मनोज आर्सेकर (पालिका अभियंते) व खजिनदार विशांत नाईक (पालिका प्रधान अभियंते) उपस्थित होते.
यंदाच्या मिरवणुकीसाठी पारंपरिक, क्लब-इन्स्टिटय़ूट, फॅमिली, क्लोवन-जॉकर व पुरस्कर्ते अशा गटात घेतली जाणार आहे. त्या शिवाय 25 व 26 रोजी मडगाव पालिकेसमोर उभारण्यात येणाऱया व्यासपीठावर लहान मुलांसाठी स्पर्धा तसेच लाईव्ह बॅण्ड पथकाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली.









