कारचालक जागीच ठार : कुटुंबातील तिघे जखमी,वाहने, दुकाने, वीज खांबाची हानी
प्रतिनिधी / मडगाव
मंगळवारी सकाळी रावणफोंड-मडगाव येथे झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला तर कारमध्ये त्याच्यासोबत असलेल्या त्याच्याच कुटुंबातील इतर तिघेजण जखमी झाले आहेत. कारची जबरदस्त धडक बसल्याने एकूण चार वाहनांसह दोन दुकानांची हानी झाली आहे.
कार चालकाचे नाव वेनोन फर्नाडिस (49 वर्षे) असे असून तो विदेशी जहाजावर काम करीत होता. तो सुरावली येथे राहणारा होता. या अपघातात त्याची पत्नी वेनिया (45) एक भाऊ वेनान्सियो (55) व मयताचा 10 वर्षांचा एक मुलगा जखमी झाला. जखमीवर उपचार चालू आहेत.
बेफाम वेगाने जात होती कार
मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची ही घटना सकाळी घडली. मयत फर्नाडिस यांची दोन घरे आहेत.. एक सुरावली येथे तर दुसरे सां जुझे दी आरियाल येथे आहे. कारचालक सुरावली येथील आपल्या घराहून सां जुझे दी आरियाल येथे बेफाम वेगाने जात होता.
बेफाम वेग अन् गतिरोधकाकडे दुर्लक्ष
रावणफोंड-मडगाव येथे लष्कराची छावणी आहे आणि त्या छावणीजवळील राज्य महामार्गावर वाहनांनी आपली गती मंद करावी म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून गतिरोधक आहे. भरवेगात जात असलेल्या फर्नाडिस यांचे या गतिरोधकाकडे दुर्लक्ष झाले आणि कार भरवेगात गतिरोधकावर चढली तेव्हा कारचालकाचा कारवरील ताबा गेला.
वाहने, दुकाने वीज खांबाला धडक
रस्त्याच्या बाजूला काही वाहने होती. दोन दुचाकींना या कारची धडक बसली. एका रिक्षाला धडक बसली. डाव्या बाजुला दोन दुकाने होती. त्या दुकानांना या कारची धडक बसल्याने दुकानांचीही हानी झाली. शेवटी रस्त्याच्या बाजुला असलेल्या विजेच्या खांबाला जबरदस्त धडक बसली तेव्हा ही कार थांबली. यावरुन ही कार किती बेफाम वेगाने जात होती याची सर्वसामान्यांना कल्पना येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जखमींवर मडगावात उपचार
घटनेची खबर कळताच मडगाव पोलीस घटनास्थळी गेले व त्यांनी पंचनामा व इतर पोलिसी सोपस्कर पूर्ण केले. मयताला मडगावच्या सरकारी इस्पितळात नेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी मृतदेहावर शवचिकित्सा केली व मृतदेह मयतांच्या नातेवाईककडे सोपविला. इतर जखमींवर उपचार चालू आहेत. मडगाव पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिश मडकईकर व मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्टेन्ली गोम्स, हवालदार रणजित देसाई यांनी पोलिसी प्रक्रिया पूर्ण केली.
मडगाव रेल्वे स्थानकावर दोन मृतदेह
विस्तार केलेल्या मडगाव रेल्वे स्थानकावर काल मंगळवारी दोघेजण मृतावस्थेत सापडले. सर्वप्रथम पोलिसांना एकाच मृतदेहाची माहिती मिळाली होती. त्या माहितीची शहानिशी करण्यासाठी पोलीस मडगाव रेल्वे स्थानकाच्या विस्तारीत प्लॅटफॉर्मवर गेले असता एक व्यक्ती मृत सापडली. त्यानंतर पोलिसांची याच विस्तारीत प्लॅटफॉर्मच्या दुसऱया प्लॅटफॉर्मवरील आणखी एका व्यक्तीवर नजर गेली. जवळ जाऊन पोलिसांनी खात्री केली तेव्हा तिही व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. या दोन्ही मयतांची नावे समजू शकली नाहीत. दोन अज्ञात मृतदेह सापडलेत अशी पोलिसांनी नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक हिरु कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.









