न्यू मार्केट टेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांच्याकडून नाराजी, मुख्याधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ मडगाव
कोविड-19 च्या महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मडगावचे न्यू मार्केट बंद ठेवण्यात आले होते. मात्र या काळात पदपथांवर तसेच रस्त्यांच्या कडेला बेकायदा विपेत्यांनी ठाण मांडून व्यवसाय चालू ठेवला होता. असे बेकायदा विपेते अजूनही बिनधास्त व्यवसाय करत असून पालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याबद्दल न्यू मार्केट टेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी नाराजी व्यक्त करताना मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना एक निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदनात पिंपळकट्टा, बँक ऑफ बडोदा, कोहिनूर स्वीट मार्टनजीक, पिकअप स्थानक तसेच मार्केटसभोवतालील परिसरांत कित्येक बेकायदा विपेते पदपथांवर व रस्त्यांवर तसेच वाहनांमध्ये साहित्य ठेवून बेकायदा व्यापार करत असल्याचे मुख्याधिकाऱयांच्या नजरेस आणून देण्यात आले आहे. अशा प्रकारांमुळे न्यू मार्केटमध्ये ग्राहक फिरकत नसून येथील व्यापाऱयांच्या व्यवसायावर परिणाम झाला असल्याचा दावा शिरोडकर यांनी केला आहे.
व्यापाऱयांना बसलेला फटका कायम
लॉकडाऊनमुळे दीड महिनाभर मार्केट बंद राहिले. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कित्येक महिने दुकाने आळीपाळीने एक दिवस खुली व एक दिवस बंद ठेवावी लागली. त्यामुळे ग्राहकांकडून होणाऱया खरेदीबाबत बसलेला फटका अजूनही व्यापाऱयांना सोसावा लागत असल्याची कैफियत त्यांनी मांडली. सरकारकडून मार्केटमधील व्यापाऱयांना कोणतेही आर्थिक पॅकेज मिळालेले नाही. मार्केटमधील काही जण कोविडबाधित झाल्याने मध्यंतरी मार्केट बंद ठेवावे लागले होते. काही बाधित व्यापाऱयांना प्राण गमवावे लागले, याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
बेकायदेशीर मासेविक्रीवर कारवाईची मागणी
बोरकर सुपर स्टोअरजवळ बसून व मार्केट परिसरात फिरून बेकायदा मासेविक्री करणाऱयांवरही कायद्याचा बडगा उचलण्याची मागणी शिरोडकर यांनी केली आहे. बेकायदेशीर विपेते आपला सडलेला माल सालसेत फार्मसीजवळील पॅसेजमध्ये टाकत असल्याने येथे दुर्गंधी पसरते व ग्राहक या पॅसेजमधून येण्याचे टाळतात. त्यामुळेही ग्राहक लाभत नसल्याचे कारण शिरोडकर यांनी पुढे केले आहे.
पालिकेचा पार्किंग प्रकल्प पाच वर्षे रेंगाळला आहे. मार्केट परिसरात वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने वाहने घेऊन येणारे ग्राहक न्यू मार्केटला भेट देण्याचे टाळतात. काही वाहने मार्केट परिसरात कायमची उभी करून ठेवल्याचे आढळून येत असून त्यांच्यावर कारवाई करून ती त्वरित हटवावीत, अशी मागणी त्यांनी निवेदनातून मुख्याधिकाऱयांकडे केली आहे. मार्केटजवळ असलेले सुलभ शौचालय नादुरुस्त स्थितीत असून येथे स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.









