एफडीए कमर्चारी, ग्राहकांत गोंधळ : पोलिसांना करावा लागते हस्तक्षेप
प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात येणाऱया माशांची फॉर्मेलिन तपासणी योग्यरित्या केली जात नसल्याने काल मंगळवारी पहाटे बराच गेंधळ माजला. माशांच्या फॉर्मेलिन तपासणीत पारदर्शकता ठेवली जात नसल्याने ग्राहकांनी एफडीएच्या कर्मचाऱयांना जाब विचारला. शेवटी फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आम्ही खात असलेले मासे हे फॉर्मेलिन मुक्त आहे याची खात्री प्रत्येकाला मिळायला पाहिजे. त्यामुळे माशांची फॉर्मेलिन तपासणी करताना ते जनतेच्या समक्ष करावी अशी मागणी काही ग्राहकांनी करून एफडीएच्या कर्मचाऱयांना जाब विचारला. मात्र, यावेळी डय़ुटीवर असलेल्या एफडीएच्या कर्मचाऱयांनी ग्राहकांना कार्यालयातून बाहेर जाण्याचा आदेश दिला. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले.
फॉर्मेलिन तपासणी हा फार्स
मडगावात माशांची फॉर्मेलिन तपासणी केली जाते, ती फार्स असल्याचा आरोप यावेळी ग्राहकांनी केला. माशांची कशा प्रकारे तपासणी केली जाते हे ग्राहकांना दर्शविण्यात येत नाही. तपासणीसंदर्भात गुप्तता का ठेवली जाते असा सवालही ग्राहकांनी उपस्थित केला. या ठिकाणी माशांची फॉर्मेलिन तपासणी केलीच जात नाही. तो एक फार्स असल्याचा आरोपही ही ग्राहकांनी केला. यावेळी एफडीएचे कर्मचारी व ग्राहक यांच्यात बरीच बाचाबाची झाली.
हे प्रकरण फातोर्डा पोलिसांपर्यंत पोचल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला जात असल्याचे सांगून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच ग्राहकांना एफडीएच्या कार्यालयातून बाहेर पडण्यास सांगितले. त्याप्रमाणे, ग्राहक कार्यालयातून बाहेर पडले व परिस्थिती नियंत्रणात आली.
तपासणीसाठी घेतलेले मासे परत केले जात नाही
फॉर्मेलिन तपासणीसाठी जे मासे घेतले जातात, त्यातील अवघ्याच माशांची तपासणी केली जाते, उर्वरित मासे विक्रेत्यांना परत दिले जात नसल्याचा दावा ही विक्रेत्यांनी केला. उर्वरित मासे एफडीएचे अधिकारी का ठेऊन घेतात असा सवालही उपस्थित करण्यात आला.









