स्टेशनरोडवर साचले पाणी, अनेक गाडय़ांनी पाणी शिरल्याच्या घटना
प्रतिनिधी / मडगाव
सोमवारी रात्री व मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मडगाव शहरातील सखल भागात बरोच पाणी साचले गेले. स्टेशन रोड आणि मडगाव पालिका परिसरात पाणी साचले तर चिंचोणे परिसरात झाड पडल्याची एक घटना मंगळवारी घडली.
सोमवारी रात्री तसेच मंगळवारी दिवसभर मडगाव व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडला. पावसाबरोबरच ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने सुसाटय़ाचा वारा वाहात असल्यामुळे सर्वसामान्याना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले.
मडगाव शहरातील स्टेशन रोड हा काही प्रमाणात सखल भाग आहे. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी दिवसभर मडगाव व आसपासच्या परिसरात पाऊस पडल्यामुळे स्टेशन रोडवर पाणी साचले होते. या रस्त्यावर गुडगाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या बाजुला असलेल्या काही गाडय़ात पाणी शिरले होते.
चिंचोणे गावातील सांतामड्डी या वाडय़ावर एक झाड रस्त्यावर कोसळले. मडगावच्या अग्नी शमन दलाच्या जवानानी या ठिकाणी धाव घेऊन कोसळलेले झाड कापून रस्त्याच्या बाजुला केले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
सोमवारी रात्री तसेच मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसानेकहर केला. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कौलारु घरात छपरावरुन पाणी झिरपल्याच्या नोंदी आहेत. 18 जूनपर्यंत मोठय़ा प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वेध शाळेने व्यक्त केलेली आहे.









