प्रतिनिधी / मडगाव
मडगाव नगरपालिकेच्या इमारीतसमोर पार्क केलेल्या एका आलिशान कारला शनिवारी रात्री आग लागण्याची घटना घडली. ही आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्नीशामक दलाने व्यक्त केली आहे. कारच्या इंजिनला आग लागल्याने लाखो रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मडगाव नगरपालिकेच्या इमारतीसमोर पार्क केलेल्या कारला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. या कारच्या शेजारी अनेक दुचाकी पार्क केलेल्या होत्या. त्यांनाही धोका निर्माण झाला होता. ही आग अचानक लागल्याचे सांगण्यात आले. ही आग कारचे इंंजिन गरम झाल्याने किंवा बॅटरीची शॉर्टसर्क्रीट झाल्यानेच लागली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही आग विझविण्यासाठी नंतर अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्नीशामक दल घटनास्थळी पोचे पर्यंत कारचा दर्शनी भाग जळून खाक झाला होता.









