बीएमडब्ल्यू झाली खाक
प्रतिनिधी / मडगांव
मडगावच्या कोलवा सर्कलमध्ये काल गुरूवारी दुपारी धावत्या बीएमडब्ल्यू कारला आग लागून कार खाक झाली. ही कार रोहन कारेकर यांच्या मालकीची असून तेच स्वता कार चालवित होते. कोलवाहून मडगावच्या बाजूने येत असताना बीएमडब्ल्यू कारने मागच्या बाजूने पेट घेतला.
कारच्या मागच्या बाजूला आग लागलीय याची कोणतीच कल्पना रोहन कारेकर यांना नव्हती. यावेळी रस्त्यावरील अन्य वाहन चालकाने त्यांना कारच्या मागच्या बाजूला आग लागल्याची कल्पना दिली. त्यावेळी त्यांनी कोलवा सर्कलात कार उभी केली व ते कारमधून त्वरित बाहेर पडल्याने सुखरूप रित्या बचावले. यावेळी अवघ्या क्षणात संपूर्ण कार आगीच्या ज्वालांनी लपेटली गेली. त्यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबून राहिली.
कारला आग लागल्याची कल्पना मडगाव अग्नीशामक दलाला दिल्यानंतर अग्नीशामक दलाचे जवान घटनास्थळी पोचले तो पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती. बीएमडब्ल्यू ही आलिशान कार असून तिची किंमतही लाखो रूपयांच्या घरात आहे. आपली लाखो रूपये किंमतीची आलिशान कार आगीत जळून खाक होताना पाहण्याशिवाय रोहन कारेकर काहीच करू शकले नाहीत. कारमधून ते सुखरूपरित्या बाहेर पडले. मात्र, कारमधील इतर सामान आगीच्या भक्षस्थांनी पडले. त्यात त्याचे पाकिट देखील होते. कारमधील ‘इंधन’ रस्त्यावर पडल्याने त्याने ही पेट घेतला होता.
ही आग नेमकी कशी लागली हे उशिरा पर्यंत स्पष्ट झाले नव्हते. मात्र, बॅटरीच्या शॉर्ट सर्क्रीटमुळे ती लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.