प्रसाद नागवेकर/ मडगाव
परप्रांतीय बेघर मजूर मडगाव पालिका चौकात गर्दी करत असल्याचे वृत ‘तरुण भारत’मध्ये शनिवारी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी सकाळपासून मोहीम हाती घेताना या चौकात व नजीकच्या परिसरात फिरणाऱया मजुरांना हाकलून लावल्याचे सांगण्यात आले.
तरी असता दुपारी बिगरसरकारी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱया जेवणाची पार्सल्स घेण्यासाठी या मजुरांनी गर्दी केली होती. मात्र यावेळी रांगेत उभे राहताना सोशल डिस्टन्सिंग ठेवले जाणार याची काळजी एनजीओचे कायकर्ते घेताना दिसून आले. दरदिवशी दिडशेच्या आसपास हे मजूर पालिका चौकाच्या परिसरात जमा होत असतात. मागील कित्येक दिवसांपासून 100 ते 125 लोकांना आम्ही जेवण पुरविले आहे, असे फातोर्डतील समाजसेवक कामिलो बार्रेटो यांनी सांगितले.
अन्न पुरविण्याचे काम आम्ही करत आहोत. अन्य सोशल डिस्टन्सिंग ठेवणे यासारख्या बाबी पाहणे प्रशासन व पोलिसांचे काम आहे. नावेलीतील सरकारी आसरास्थळातून या मजुरांना बाहेर कोण सोडतो, असा सवाल उपस्थित करून यावर बंधने यायला हवीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तेथील सर्व 450 मजुरांना आम्ही जेवण पुरवू शकत नाही. आमच्याकडे गरजुंना जेवण पुरविण्याचा पास असून त्यानुसार येणाऱया गरजूंना जेवण पुरविले जाते. दिवसाला शंभर ते सव्वाशे जणांना आपली एनजीओ जेवण पुरवत असल्याचे बार्रेटो यांनी स्पष्ट केले.









