प्रतिनिधी/ मडगाव
कोल्हापूरहून आलेल्या ऑक्सिजन टँकरमधील ऑक्सिजन नव्या जिल्हा इस्पितळात खाली करण्यासाठी पाईप जोडणी करताना त्यातून ऑक्सिजनची गळती सुरू झाली व मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजन बाहेर पडू लागला. त्यामुळे एकच गोंधळ माजला. मात्र, या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
ऑक्सिजनची गळती मोठी असल्याने, त्यावर नियंत्रण कसे मिळवावे, असा प्रश्न उपस्थितीत झाला. मात्र, अग्निशामक दलाने पाण्याचा वापर करून नियंत्रण मिळविले. नव्या जिल्हा हॉस्पिटलच्या ठिकाणी अग्निशामक दलाचा एक बंब तैनात करण्यात आलेला आहे. त्याचा वापर करण्यात आला व नंतर मडगावमधून आणखी दोन बंब मागविण्यात आले.
पाईप जोडणी करणारा कर्मचारी जखमी
अग्निशामक दल व पोलीस यांनी याकामी महत्वाची भूमिका बजावली. ऑक्सिजन खाली करण्यासाठी पाईपची जोडणी करणारा कर्मचारी बाबूराव देसाई हा किंचित जखमी झाला आहे. त्यांच्या कपाळाला थोडी जखम झाली आहे.
ऑक्सिजन टंकरला गळती लागल्याची माहिती मिळताच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी अग्निशामक दलाचे नितीन रायकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेमुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली. जिल्हाधिकाऱयांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दल व पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट केले.









