आज थिवीतून खास रेल्वेने मध्यप्रदेशला रवाना होणार
प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आपआपल्या गावी परतण्यासाठी अर्जाद्वारे नोंदणी केलेल्यांपैकी मध्यप्रदेशात जाणाऱया 400 मजुरांना मडगाव येथून गुरुवारी पेडे येथे नेण्यात आले. सदर मजुरांच्या भ्रमणध्वनीवर फातोर्डा स्टेडियमजवळ गोळा होण्याचा संदेश आल्यानंतर या मजुरांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली. 13 कदंब बसेसमधून त्यांना नेण्यात आले. सोशल डिस्टन्सिंग ठेवून एका आसनावर एक अशी व्यवस्था करून या 400 मजुरांना पेडे येथील स्टेडियमवर नेण्यात आले.
संयुक्त मामलेदार मधू नार्वेकर यांची फातोर्डा स्टेडियमजवळ उपस्थिती होती. त्याच्याजवळ विचारणा केली असता आज शुक्रवारी थिवी रेल्वे स्थानकावरून मध्यप्रदेशकडे खास रेल्वे सोडण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यातून हे 400 तसेच राज्यातील अन्य ठिकाणांहून आलेले कामगार मिळून हजारभर मजूर प्रवास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोवा ‘कोविड’मुक्त असल्याने परप्रांतीय मजुरांनी गोव्यातच कामासाठी थांबावे असे सांगितले गेले असले, तरी हे मजूर गावी जाण्यास पसंती देत असल्याचे सांगण्यात आले आहे.









