म्हापसा पालिकेच्या धर्तीवर सील ठोकण्याचे मुख्याधिकाऱयांकडून संकेत
प्रतिनिधी /मडगाव
म्हापसा पालिकेने अलीकडेच एका विशेष मोहिमेद्वारे आपल्या अधिकारक्षेत्रात व्यापार परवाना किंवा आरोग्य, अग्निशामक विभाग यांच्या आणि इतर अनिवार्य परवानग्यांशिवाय कार्यरत असलेल्या व्यावसायिक आस्थापनांना सील ठोकलेले आहे. अशीच कारवाई मडगाव पालिकेकडून करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी दिला आहे.
मडगाव पालिकेने नुकत्याच कर वसुलीसाठी राबविलेल्या मोहिमेदरम्यान अनेक व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि 31 ऑक्टोबर, 2021 पर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचा मुदत दिली होती. या मुदतीचे काटेकोरपणे पालन केले गेले नसल्याने मुख्याधिकाऱयांनी कर विभागाला 10 दिवसांच्या आंत अशा बेकायदा व्यवसायांचा तपशीलवार अहवाल तयार करण्यास सांगितले आहे.
संशयास्पद मार्गाने चालणारा आणि आवश्यक नियमांचे पालन न करणारा व्यवसाय हा बेकायदेशीर तसेच पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध मानला जाईल आणि अशा बेकायदा आस्थापनांचा अहवाल तयार झाल्यानंतर कठोरपणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेचा कर आकारणी विभाग अशा बेकायदेशीर व्यवसायांवर नियमित लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे असे अवैध व्यवसाय करणाऱयांनी आपणहून पुढे येऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. हे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाई अटळ आहे, असे फर्नांडिस यांनी सांगितले आहे. पालिकेच्या कर आकारणी विभागाने करभरणा कमी झाल्याची नोंद केली आहे आणि त्यामुळे डिसेंबरपर्यंत कर्मचाऱयांचे पुढील वेतन फेडण्यावर परिणाम होऊ शकतो, असे नजरेस आणून दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱयांनी कर विभागाला कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
कंत्राटी कामगारांचा तपशील सादर करण्याचा निर्देश
मडगाव पालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घरोघरी कचरा गोळा करण्यात गुंतलेल्या कामगारांची पोलिसांकडून पडताळणी होण्याची तसेच त्यांनी अनोळखी व्यक्तींसाठी असलेले अर्ज भरून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन ज्या यंत्रणा मडगाव पालिकेसाठी काम करतात आणि कंत्राटी कामगार वापरतात त्यांनी आधार कार्डांसह भाडेकरूंसाठीच्या पडताळणी अर्जांचा तपशील तातडीने सादर करावा, असा निर्देश मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिला आहे.









