प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेच्या हद्दीत बेकायदा बांधकामे वाढली असून पालिकेपासून 200 मीटर अंतरावर बोरकर सुपर मार्केटच्या समोर एक गाडा रातोरात उभारण्याचा प्रकार घडलेला आहे. यासंदर्भात पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या अभियंत्यांकडे विचारणा केली असता तपासणी करण्यात येईल असे सांगून कानाडोळा करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
एक गाडा उभा राहील एवढय़ा येथील जागेत झाडेझुडुपे होती. आठवडाभरापूर्वी कोणी तरी ती छाटून टाकली होती. तीन-चार दिवसांनंतर येथे एक पक्का गाडा उभा राहिल्याचे दिसून आले. सदर गाडा तयार करून येथे आणून बसविण्यात आला असण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात पालिकेचे साहाय्यक अभियंता प्रशांत नागवेकर यांच्याशी विचारणा केली असता कनि÷ अभियंता विराज बोलणेकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्यांच्याशी विचारणा केल्यास प्रभाग-14 आपण पाहत नसून विकास नामक अभियंता पाहत असल्याचे सांगण्यात आले.
कारवाई करण्यास सांगणार : नगराध्यक्षा
हा प्रकार नगराध्यक्षा पूजा नाईक यांच्या नजरेस आणून दिले असता आपण तांत्रिक विभागाला आवश्यक कारवाई करण्यास सांगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता सदर जागा एका दुकानदाराची असल्याचा दावा त्यांनी केला व सदर दुकानदाराने जागा अडवून ठेवली असावी असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु जागा अडविण्यासाठी गाडेवजा बांधकाम करण्याचे अधिकार कोणी दिले अशी विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
मडगाव शहरातून हटविलेल्या गाडेचालकांचे कित्येक दशके झाली, तरी अजूनही कायमस्वरूपी पुनर्वसन झालेले नसून असे असताना रातोरात बेकायदा गाडे उभे राहण्याचे प्रकार घडत आहेत. पालिकेचे अशा प्रकारांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरी भागात पालिकेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे झाल्याचे दिसून येत आहे.









