मुख्याधिकाऱयांनी बंद करायला लावलेले मार्केट नगराध्यक्षांनी उघडायला लावले, मात्र जिल्हा प्रशासनाकडून टाळे, पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार
प्रतिनिधी / मडगाव
सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने तसेच किराणा मालाच्या विक्रीस सूट दिलेली असताना अन्य दुकाने खोलली जात असल्याने मुख्याधिकाऱयांनी मंगळवारी न्यू मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश दिल्यानंतर नाटय़मय घडामोडी घडल्या. नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करून ते खोलण्यात आले, मात्र लगेच जिल्हा प्रशासनाने त्यास टाळे ठोकले. बुधवारपासून ते बंदच ठेवण्यात येणार असल्याचे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.
सोमवारी मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी न्यू मार्केटची पाहणी केली असता सदर मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसल्याचे तसेच किराणामालाच्या जोडीला परवानगी नसलेले व्यापार सुरू असल्याचे दिसून आले होते. त्यांनी मार्केटमधील संघटनेच्या नेत्यांना मंगळवारपासून ते बंद करणे भाग पडणार असल्याचे स्पष्ट केले होते व त्यानुसार मार्केट बंदही ठेवण्यात आले.
नगराध्यक्षांकडून मार्केट उघडण्याचा निर्देश
काही व्यापाऱयांनी सदर बाब नगराध्यक्षा पूजा नाईक यांच्या नजरेस आणून दिल्यावर मुख्याधिकाऱयांनी आपणास न्यू मार्केट बंद ठेवत असल्याबद्दल कोणतीही कल्पना दिलेली नसल्याचे सांगून त्यांनी न्यू मार्केट खोलावे असे मार्केट निरीक्षकांना निर्देश दिले. यावेळी फक्त किराणामालाची व जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने खोलण्यास त्यांनी सांगितले. त्यानुसार काहींनी दुकाने खोलून व्यापारही केला.
टाळे ठोकण्यास भाग पाडले
सदर बाब जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचल्यावर मामलेदार व अन्य अधिकाऱयांनी येऊन सदर मार्केटच्या खुल्या गेटला टाळे ठोकण्यास मार्केट निरीक्षकांना भाग पाडले व जिल्हाधिकाऱयांचे पुढील आदेश येईपर्यंत मार्केट न उघडण्याचे निर्देश दिले. नगराध्यक्षांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी अजित राय यांच्याशी संपक साधला असता सोशल डिस्टन्सिंग योग्य प्रकारे पाळले जात नसल्याने बहुतांश मार्केट परिसर बंदच ठेवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे नगराध्यक्षांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
‘तरुण भारत’चे वृत्त ठरले खरे
न्यू मार्केटमध्ये व्यापाऱयांचे दोन गट असून दोन संघटना कार्यरत आहेत. तसेच सध्या मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्यातच मार्केट निरीक्षक व त्यांच्या हाताखालील कामगार व व्यापाऱयांनी सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची काळजी न घेतल्यामुळे दोन-अडीच तासांसाठी खुले ठेवण्याची मुभा मिळालेले न्यू मार्केट बंद ठेवण्याची पाळी आली आहे हे स्पष्ट होते. ‘तरुण भारत’ने सुरुवातीचे दोन-तीन दिवस सोडल्यास अलीकडे न्यू मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले होते, ते खरे ठरले आहे.









