प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात, घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम व मार्केटचे सोपो कंत्राटदार मिलाग्रीन फर्नांडिस यांच्यात जबरदस्त राडा झाला. दोघांनी एकमेकावर प्रचंड आरोप केले. प्रकरण हातघाईवर जाण्याची शक्यता देखील निर्माण झाली होती. फातोर्डा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणावर ताबा मिळविल्याने संभाव्य संघर्ष टळला.
मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात, मासळी घेऊन येणाऱया वाहनांकडून सोपो कंत्राटदार मिलाग्रीन फर्नांडिस हे भरमसाठ शुल्क आकारतात, पण वाहनाना मार्केट मध्ये प्रवेश देत नाही. तसेच मार्केटात स्वच्छता ठेवण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोप इब्राहिम यांनी केला. तसेच इसवण व अन्य चांगली मासळी मार्केटात आल्यास ती जबरदस्तीने काढून घेतली जाते. या मासळीचे पैसे देखील दिले जात नाही. मार्केटचे सोपो कंत्राटदार दररोज किमान तीन लाख रूपयांची कमाई करतात. पण, या ठिकाणी कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप घाऊक मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम यांनी केला.
घाऊक मासळी मार्केट विक्रेता संघटणे तर्फे एसजीपीडीएला निवेदन सादर करण्यात आले असून त्यात मार्केटचे सोपो कंत्राटदार कोण, मार्केटची स्वच्छता, तसेच मासळी वाहन चालकांना मिळणारी वागणूक या गोष्टीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. जर या मागण्याकडे दुर्लक्ष केले नाही तर घाऊक मासळी विक्रेता संघटना पुढील कृती करणार असल्याचे इब्राहिम यांनी स्पष्ट केले आहे.
इब्राहिम हे फोर्मेलिन माफिया
घाऊक मासळी मार्केट विक्रेता संघटणेचे अध्यक्ष इब्राहिम हे फोर्मेलिन माफिया असल्याचा आरोप यावेळी सोपो कंत्राटदार मिलाग्रीन फर्नांडिस यांनी केला. पूर्वी फोर्मेलिनचा वापर केलेली मासळी या मार्केटात यायची परंतु, ती आत्ता बंद झाल्याचा दावा त्यांनी केला. इब्राहिम हे बिगर गोमंतकीय असून ते इथे भांडणे लावून आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आपले सोपो कंत्राटदार संपलेले असल्यास ते पुराव्यासहीत सिद्ध करावे, तसेच आपण मासळी जबरदस्तीने घेतल्यास ते ही सिद्ध करून दाखविण्याचे आवाहन त्यांनी इब्राहिम यांना दिले. इब्राहिम यांचे फातोडर्य़ात राजकीय ‘गॉड फादर’ असून त्यांच्या तालावर ते दादागिरी करतात. पण, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा देखील मिलाग्रीस फर्नांडिस यांनी दिला.
मडगावच्या घाऊक मासळी मार्केटचा सोपो मिळविण्यासाठी इब्राहिम हे धडपड करतात. मात्र, त्यांना ते शक्य होणार नसल्याचे मिलाग्रीस म्हणाले.









