आमदार सुदिन ढवळीकर यांची माहिती
वार्ताहर /मडकई
कवळे येथील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. ढवळी येथील उड्डाण पुलाजवळील जोडणीची वाहिनी काढण्यात आलेली आहे. फेब्रुवारी महिन्यात ती जोडली जाईल व त्यानंतरच मडकई मतदार संघातील अंतर्गंत रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण होईल. या जोडणीनंतर रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण केले असते, तर रस्ते पुन्हा फोडावे लागले असते, अशी माहिती स्थानिव आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना दिली.
ढवळीकर यांनी यावेळी भाजपावर टिका केली. नोरकभरतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे राज्यातील सुशिक्षित युवकांवर अन्याय झाला आहे. भाजपाने सर्वत्र मोठे फलक लावून पाच वर्षे विकासाची हा त्यांचा प्रचार जनतेची दिशाभूल करणारा आहे. पुढील पाच वर्षे ही विकासाची नसून भ्रष्टाचाराची आहेत, असा आरोप त्यांनी केला.
खाणी बाबत सरकारचे निश्चित धोरण नसल्याने प्रचंड घोळ घातलेला आहे. डंप मालाची आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री केल्यास प्रत्येक गोवेकरांचे एक घर बांधून देण्या इतपत पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील. खनीज डंप मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळत असलेल्या किमंतीपेक्षा अल्प दराने हा डंप विकल्याचे निवेदन मुख्यमंत्री व सरकार करीत असल्याचा आरोप आमदार ढवळीकर यांनी केला. मडकई मतदार संघात जेव्हा आपण प्रथम निवडणुकीला उभा राहिलो, तेव्हा सर्वांच्या दारात गेलो. मात्र त्यानंतर मडकईतील जनतेचे प्रेम संपादन केले म्हणून परत लोकांच्या दारात जाण्याची पाळी आपल्यावर आली नाही. आपण स्वतः प्रचार न करता कार्यकर्ते व मतदारांनीच आपला प्रचार केला म्हणून मडकईतील जनतेने प्रचंड मतांनी निवडून दिले. याही निवडणुकीत मडकईतील जनतेने तसेच प्रेम दाखवून मोठय़ा मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या विधानसभेच्या प्रचाराला शनिवार 8 रोजी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन सुरुवात केली जाईल. श्री नागेश, कटमगाळ, देवी नवदुर्गा अशा सर्व मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले जाणार असून मतदार व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.









