ठरावांना विरोध केल्याने मनपा बैठकीत खडाजंगी
प्रतिनिधी /पणजी
राजधानीतील विविध प्रकल्पांच्या प्रश्नांवरून विरोधी नगरसेवक उदय मडकईकर आणि सुरेंद्र फुर्तादो यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पणजी मनपाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत प्रचंड खडाजंगी झाली. मडकईकर-फुर्तादो यांच्या आक्रमतेत महापौर रोहित मोन्सेरात व आयुक्त आग्नेल फर्नांडिस यांची अक्षरशः गोची झाली. नगरसेवक शुभम चोडणकर आणि प्रमय माईणकर यांच्याशीही त्यांची शाब्दिक चकमक उडाली. तरीही बहुमताच्या जोरावर सत्ताधारी मंडळाने सर्व ठराव संमत करून घेतले.
महापौर रोहित मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राजधानीतील मार्केटचे तिसरे संकुल, नॅशनल थिएटरच्या जागी नवा प्रकल्प उभारणे तसेच पणजीतील विकासकामांसाठी जीसुडाच्या सल्लागाराची नियुक्ती करणे यासारखे प्रस्ताव मांडण्यात आले होते. मात्र त्यावरील चर्चा सुरू होताच मडकईकर-फुर्तादो यांनी सदर प्रस्तावांना जोरदार आक्षेप घेत महापौर मोन्सेरात व आयुक्त श्री. फर्नांडिस यांना घेरले. त्यामुळे मनपा बैठकीत एकच खडाजंगी झाली व मडकईकर-फुर्तादो यांची अन्य नगरसेवकांकडे शाब्दिक चकमक उडाली.
पणजीतील विकासकामे करण्यासाठी स्मार्ट सीटीची नियुक्ती करण्यात आलेली असताना जीसुडाचा सल्लागार नियुक्त करण्याची गरजच काय? असा सवाल मडकईकर-फुर्तादो यांनी उपस्थित केला. सल्लागार नियुक्त करण्याचा अधिकार मनपाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. सल्लागार नियुक्त करायचाच असेल तर योग्य प्रक्रिया करून निविदा मागवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच या प्रकरणी महापौरींची दिशाभूल होत असल्याचा आरोपही त्यांनी केली.
गत कित्येक वर्षांपासून पणजीतील नागरिकांची करमणूक केलेल्या नॅशनल थिएटरचा करार 2015 मध्ये संपुष्टात आला. तेव्हापासून ते कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. आता व्यापारी संकुल बांधण्याच्या नावाखाली सदर जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यासाठी कोणतीही चर्चा नाही की खर्चाची तरतुदही करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही, प्रसंगी न्यायालयातही धाव घेणार, असा इशारा मडकईकर यांनी दिला.
दरम्यान, मडकईकर-फुर्तादो यांना उत्तर देण्यासाठी उभे राहिलेले नगरसेवक शुभम चोडणकर यांच्याशीही त्यांची जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याने वातावरण तापले. त्यावेळी आयुक्तांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्यात यश मिळविले.
मार्केटच्या तिसऱया टप्प्यातील प्रकल्पात दुकाने कोणाला देणार त्यांची यादी अगोदर जारी करा व त्यानंतरच प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ करा, अशी मागणी मडकईकर यांनी केली. त्याचबरोबर अन्य प्रस्तावांनाही त्यांनी हरकत घेतली. बैठकीस उपमहापौर वसंत आगशीकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्यातील 25 नगरसेवकांचा पाठिंबा असलेल्या सत्ताधारी मंडळाने सर्व विरोध डावलत सर्व ठराव संमत केले.









