प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूमुळे मटण दुकाने बंद करण्यात आली. त्याचबरोबर बकऱयांचाही तुटवडा जाणवू लागल्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद करून घरीच थांबणे पसंत केले आहे. मात्र खवय्यांना अजूनही मटणाविना राहणे कठीण झाल्यामुळे आता त्यांनी वाटय़ावरच भर दिला आहे. शहरातील उपनगराबरोबरच ग्रामीण भागामध्ये अनेकजण बकरी आणून त्याचे वाटे घालताना दिसू लागले आहेत.
काही दिवसापूर्वी वडगाव परिसरात चक्क शिवारातच वाटे घातले होते. मात्र त्यांच्यावर पोलिसांची नजर पडली आणि त्या वाटेकऱयांवर तेथेच मटण टाकून पळून जाण्याची वेळ आली होती. असे असले तरी ग्रामीण भागामध्ये अनेकांच्या घरामध्ये वाटे घालण्याचा प्रकार सुरूच आहे. वास्तविक याला आळा घालणे गरजेचे आहे. कारण वाटे घालताना दहा ते पंधराजण एकत्र वावरत असतात. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांनी हा धोका ओळखून आपल्या जिभेच्या चोचल्यांना आवर घालणे महत्त्वाचे आहे.
सध्याचा प्रसंग हा अत्यंत गंभीर आहे. आपल्या गावामध्ये किंवा परिसरात रुग्ण नाही म्हणून बेसावध राहणे अनेकांना धोक्मयाचे बनू शकते. तेव्हा प्रत्येकाने काळजी घ्यावी. अन्यथा मटणाचे वाटेच तुम्हाला महागात पडू शकतात, असे मत व्यक्त होत आहे.









