आटपाडी / प्रतिनिधी
लांडग्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढीचे मटण खाण्यासाठी दिले नसल्याच्या कारणाने भटकंती करणाऱ्या मेंढपाळांवर हल्ला करण्याचा संतापजनक प्रकार आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे घडला. हल्ला झालेले मेंढपाळ चिकोडी( जि. बेळगाव) येथील असुन मेंढपाळांसह त्यांच्या महिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून सुखदेव गहिनीनाथ कदम यांच्यासह १५ ते २० जणांवर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आटपाडी पोलीसात विठ्ठल बाळु यमगर ( रा.कोगनोळी ता.चिकोडी, जि. बेळगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पिंपरी खुर्द येथील कैकाडी वस्ती परिसरातील शेतात सचिन कोळेकर, ब्रम्हा लाटकर अजित बानशी व विठ्ठल यांची सुमारे ७०० मेंढ्या आहेत. भटकंती करून मेंढीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या या मेंढपाळाच्या कळपातील एक मेंढी गुरुवारी पहाटे लांडग्याने ठार केली. तिचे मटण खाण्यासाठी सर्व मेंढपाळांनी ती कापली. त्यावेळी पिंपरीतील सुखदेव कदम हा तेथे आला व त्याने मेंढपाळाकडे मटणाची मागणी केली.
लांडग्याने ठार केल्याने सदर मेंढीचे मटण आम्ही देवु शकत नाही, असे सांगितल्याने चिडलेल्या कदम याने विठ्ठल व सचिन या मेंढपाळांना शिवीगाळ, मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने १५ ते २० लोकांनी मोटरसायकलवरून येवुन सर्वच मेंढपाळांना लाथाबुक्या, काठी आणि दगडाने बेदम मारहाण केली. यात महिलांनाही सोडण्यात आले नाही. मारहाणीनंतर जाता-जाता सुखदेव कदम याने तक्रारदाराच्या आईशीही अश्लिल वर्तन केले. मेंढपाळांना मारहाण करणाऱ्या टोळीने जाताना ७ मेंढ्याही कळपातुन लंपास केल्या.
मेंढपाळांवर मटणासाठी हल्ल्याची माहिती मिळताच समाजकल्याणचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, विष्णु अर्जुन, जयवंत सरगर, रासपचे तालूकाध्यक्ष लक्ष्मण सरगर आदिनी घटनास्थळी धाव घेतली. मेंढपाळावरील सतत्याच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला, मेंढपाळांवर हल्ला करून महिलांनाही बेदम मारहाण करून मेंढ्या पळवून नेण्याच्या घटनेनंतरही पोलीसांनी जाणिवपूर्वक क्रॉस कंपलेट घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात लोकांनी आटपाडी पोलीस ठाणे आवारात गर्दी केली.









