खंजर गल्ली येथील मटक्याचे शेड नागरिकांनी पाडविले : राजू कडोलकर व बाळु तोपिनकट्टी यांच्या घरावर छापे
प्रतिनिधी /बेळगाव
मटकाबुकींविरूध्द बेळगाव पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. न्यायालयाची परवानगी घेवून दोघा मटकाबुकींच्या घरावर गुरूवारी सकाळी छापे टाकण्यात आले असून या छाप्यांत तीन ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली आहे. तर खंजर गल्ली, लाकूड अड्डा परिसरातील मटक्मयाचे शेड स्थानिक नागरिकांनी पाडविला आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गुरूवारी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे. मटका, जुगारी अड्डय़ांवरील कारवाई पोलिसांनी तीव्र केली आहे. कामत गल्ली व कांगली गल्ली येथील दोघा प्रमुख बुकींच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.
कामत गल्ली येथील राजू मारुती कडोलकर याच्या घरात मार्केट पोलिसांनी शोध मोहीम राबविली आहे तर मारिहाळ पोलिसांनी बाळु तोपिनकट्टी या मटका बुकीच्या कांगली गल्ली व हनुमाननगर येथील घरांवर छापे टाकून शोधाशोध केली आहे. या कारवाईत नेमके काय सापडले? याचा उलगडा झाला नाही.
मार्केट व मारिहाळ पोलीस स्थानकात मटका प्रकरणी दाखल झालेल्या गुह्यांच्या तपासासाठी न्यायालयाची परवानगी घेवून पोलिसांनी शोध मोहीम राबविली आहे. गुरूवारी दुपारपर्यंत ही मोहीम सुरू होती. मात्र या कारवाईच्यावेळी दोन्ही प्रमुख बुकी फरारी झाल्याचे समजते.
दरम्यान खंजर गल्ली, लाकूड अड्डा परिसरातील शेड स्थानिक नागरिकांनी पाडविले आहे. याच शेडमध्ये मटका चालत होता. वारंवार पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी तो शेड हटविल्याचेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी मटका, जुगाऱयांविरूध्द सुरू केलेल्या कारवाईंमुळे जुगारी व मटकाबुकींचे धाबे दणाणले आहेत.










