अटकेच्या कारवाईने खळबळ – 4 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात पोलिसांनी मटका व्यवसायावर करडी नजर वळवली असून सोमवारी मटका अड्डय़ांवर छापे टाकत चौघांना अटक केल्यानंतर मंगळवारी केलेल्या कारवाईत देखील शाहूपुरी, ढेबेवाडी व सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील 4 हजार रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, अनेक वेळा पोलीस नोटिसा देवून कारवाई करत होते. मात्र, आता अटकसत्र सुरु करण्यात आल्याने मटका व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी चार्ज स्वीकारल्यापासून साताऱयासह जिल्हाभरात मटका अड्डय़ांवर कडक कारवाई करण्यात येत होते. सातत्याने छापेमारी सुरुच होती. मात्र, तरी देखील मटका व्यवसाय सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगळवारी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी जुना मोटार स्टँड परिसरात मटका चालवणाऱया विनोद रमेश मोहिते (वय 40, रा. सोमवार पेठ, सातारा) याच्यावर कारवाई केली असून त्याच्या ताब्यातील 1 हजार 232 रुपये जप्त केले.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी मल्हारपेठेतील प्रिया व्हरायटीज दुकानाशेजारील बोळात छापा टाकून तिथे मटका चालवणाऱया विजय आनंद येवले (वय 58, रा. केसरकर पेठ, सातारा) याला अटक केली. यातील यासीन शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) हा फरारी झाला आहे. त्यांच्या ताब्यातील 1 हजार 150 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
शिवराज पेट्रोल पंपाशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये मटका चालवणाऱया गणपत किसन पवार (वय 70, रा. बारावकरनगर, एमआयडीसी, सातारा) व पंकज जाधव (रा. क्षेत्रमाहुली) यांच्यावर कारवाई केली. यातील पवार याला अटक करण्यात आली असून जाधव फरारी झाला आहे. त्यांच्या ताब्यातील 1 हजार 420 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
ढेबेवाडी पोलिसांनी ढेबेवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीत एस. टी. स्टँड चौकात मटका अड्डा चालवणाऱया विकास जयसिंग कांबळे (वय 32, रा. ढेबेवाडी) याला अटक केली असून त्याच्या ताब्यातील 272 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.








