बांधकाम व्यावसायिक ठेकेदार असोसिएशनचा इशारा : कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन
सांगाली/प्रतिनिधी
महागाईमुळे फ्रॉक्स, फळी, बांबू, वासे, लोखंडी प्लेट, मोळे, इ. मजूरीचे दर वाढल्याने, काँक्रिट मशिनरी, पेट्रोल, डिझेल दर वाढल्यामुळे इमारत बांधकाम संबंधित कामे करणे परवडत नाही. त्यात मजुरीचे दर अत्यंत कमी आहेत. याबाबत सांगली बिल्डर्स असोसिएशनकडे (क्रिडाई) मागणी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून बेमुदत संप करू, असा इशारा बांधकाम व्यावसायिक ठेकेदार असोसिएशनने दिला आहे. याबाबतचे निवेदन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत हंचनाळे, रमेश पवार, सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर, यल्लाप्पा जाधव, अमोल धोतरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार मंत्री मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात, गेली ३० ते ४० वर्षे बांधकाम व्यावसायिक ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर मजूरीने काम करीत आहोत. सेंट्रींग, बांधकाम, गिलावा, फरशी फिटींग, काँक्रिट गँग, ट्रॅक्टर पाईल कटर्स, हँड पाईल, इत्यादी इमारती कामातील अनेक मजूरी ठेकेदार असून अजूनपर्यंत मजूरीचे दर वाढवून मिळत नाहीत.
सध्या महागाईमुळे फ्रॉक्स, फळी, बांबू, वासे, लोखंडी प्लेट, मोळे, इ. मजूरीचे दर वाढल्याने, काँक्रिट मशिनरी, पेट्रोल, डिझेल इत्यांदीचे दर वाढल्यामुळे आम्हाला कामे करणे परवडत नाहीत. म्हणून आम्ही पुणे येथे बांधकाम व्यावसायिक ठेकेदार/ कॉन्ट्रॅक्टर या संघाची नोंदणी श्रमिक संघ अधिनियम १९२६ या अन्वये २५ / १० / २०२१ रोजी केली आहे. सर्व ठेकेदार / कॉन्ट्रॅक्टर एकत्र येवून दरवाढीसाठी मिटींग घेवून आमचे निवेदन सांगली बिल्डर्स असो. (क्रिडाई) यांना दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी दिले आहे. या दिवसापासून आम्ही दररोज त्यांना फोन करून विचारणा केली असता ते आम्हास कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीत. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून संप करणे, उपोषण करणे व महाराष्ट्रातील सर्व इमारतींची कामे बेमुदत बंद करणे, हे धोरण आम्हास अवलंबावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.