ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रवासी मजुरांना 15 दिवसांच्या आत त्यांच्या घरी पोहोचवा असा आदेश सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिला. तसेच लॉक डाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या गुन्हे मागे घेण्याबाबत विचार करावा असेही सांगितले आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, केंद्र आणि राज्यांनी आपल्या मजुरांची ओळख पटविण्यासाठी पद्धतशीर मार्गाने यादी तयार करावी. तसेच लॉक डाऊन संपल्यावर या मजुरांना रोजगार मिळावा यासाठी योजना तयार कराव्यात तसेच मजुरांचे कौशल्य पाहून त्यांना रोजगार द्यावा असेही सांगितले आहे.
न्यायालयाने पुढे सांगितले की, श्रमिकांकडून ट्रेनची मागणी झाल्यास रेल्वेकडून 24 तासाच्या आत ट्रेन उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच प्रवासी श्रमिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच न्यायालयाने सर्वात शेवटी सर्व राज्यांना त्यांनी केलेल्या योजना, रोजगाराची संधी आदी बाबत संपूर्ण अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी 8 जुलैला होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.