विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
ऊस उत्पादक बागायतदार शेतकऱयांना आता ऊस तोडणी मजुरांच्या कल्याणाचाही भार उचलावा लागणार आहे. त्यांच्यासाठी असलेल्या गोपीनाथ मुंडे महामंडळासाठी टनाला दहा रुपये शेतकऱयांच्या ऊस बिलातून कपात होणार आहेत. राज्यातील 147 साखर कारखान्यांकडून वर्षाला सरासरी प्रत्येक हंगामात पाच ते सहा कोटी रुपये शेतकऱयांकडून वसूल होणार आहेत. याचा राज्यातील तथापि विदर्भ, मराठवाडÎातील दहा लाख मजुरांना लाभ मिळणार आहे.
50 टक्के वाटा ऊस उत्पादक शेतकऱयांवर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध घोषणा केल्या. शेती आणि शेतकऱयांसंबधी योजना जाहीर केल्या. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत ऊस तोडणी मजुरांच्या कल्याणासाठी नवी योजना मांडली. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला प्रत्येक वर्षी सरासरी दहा ते बारा कोटी रुपये निधी कसा देता येईल याचा विचार करुन धोरण निश्चित करण्यात आले. यातील 50 टक्के वाटा ऊस उत्पादक शेतकऱयांवर सोपवून योजनेत सहभागी करुन घेतले आहे.
सर्वाधिक भार कोल्हापूर विभाग उचलणार
राज्यात 147 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 79 सहकारी तर 68 खासगी आहेत. कोल्हापूर विभागात सर्वाधिक 35 कारखाने आहेत. त्यांच्याकडून गळीत हंगामात ससरासरी दोनशे लाख मेट्रीक टन ऊस गाळप केले जाते. याचा विचार करता एका कोल्हापूर विभागातून हंगामात दोन कोटी रुपये गोपीनाथ मुंडे महामंडळाला मिळणार आहेत. तितकाच निधी राज्य सरकार देणार आहे. म्हणजे महामंडळाच्या एकूण बजेटच्या 50 टक्के वाटा हा कोल्हापूर विभाग उचलणार आहे. त्या खालोखाल 30 कारखाने असलेला पुणे विभाग आहे. या विभागातून दीड कोटी रुपये जमा होऊ शकतात. सोलापूर, नगर, नांदेड, औरंगाबाद या विभागातून दीड ते पावणेदोन कोटी जमा होणार आहेत. एकंदरीत राज्यातील 147 साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱयांकडून प्रत्येक हंगामात साडेपाच ते सहा कोटी जमा होणार आहेत, हा मोठा आधार ऊस तोडणी मजुरांना मिळणार आहेत.
विदर्भ मराठवाडÎातील मजूर शेतकऱयांना दिलासा
पश्चिम विभागासह सदन महाराष्ट्रात बहुतांशी प्रमणात ऊस पिक घेतले जाते. गळीत हंगामात ऊस तोडणीसाठी विशेषत: विदर्भ, मराठवाडÎातून मजूर येतात. हे काम करणारे राज्यात दहा लाख मजूर शेतकरी आहेत. शेती पिकत नसल्याने यांच्यावर ऊस तोडीची वेळ आली आहे. मात्र आता गोपीनाथ मुंडे महामंडळामुळे त्यांना चांगले दिवस येतील असे चित्र आहे. यंदा कोल्हापूर विभागात एक लाख 87 हजार ऊसतोडणी मजूर व त्यांचे कुटुंब दाखल झाले आहे. ऐन हंगामातच गोड बातमी त्यांच्या कानावर आल्याने तेही सुखावले आहेत.
विभाग कारखाने गाळप मेट्रीक टन निधी लाखात
कोल्हापूर 35 190.33 1903.3
पुणे 30 153.87 1538.7
सोलापूर 28 69.28 692.8
नगर 16 56.27 562.7
औरंगाबाद 19 37.00 370.0
नांदेड 14 28.87 288.7
अमरावती 2 4.05 40.5
नागपूर 3 5.28 52.8
एकूण 147 545.26 5452.6
संघटनेच्या पाठपुराव्याला यश
ऊस तोडणी मजुरांच्या मागणीसाठी संघटनेने पाठपुरावा केला होता. सातत्याने सरकारकडे पत्र व्यवहार करुन लक्ष वेधले. त्यामुळे हा निर्णय झाला. याचा मजुरांना लाभ होईल पण यापुढील वाहतूक कामगार यांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र, सेवापुस्तिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रा. आबासाहेब चौगले, राज्य उपध्यक्ष,
महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतुक कामगार संघटना
(पूर्वार्ध)









