कथा-कवितांमध्ये आणि विशेषतः हिंदी सिनेमात प्रियकर आणि प्रेयसी लोकांची मजेदार वर्णने असतात. या लोकांना अनेकदा मजनू आणि लैलाची उपमा दिली जाते. प्रियकर म्हणजे मजनू आणि प्रेयसी म्हणजे लैला. जनरली प्रियकर गरीब असतो. लैला पैसेवाल्याची मुलगी असते. तिने मजनूशी लग्न करू नये म्हणून बाप तिला कोंडून ठेवतो. पण मजनूने अपरात्री गाणं वगैरे गाऊन तिला साद दिली की ती खिडकीचे गज तोडून किंवा अन्य मार्गाने घरातून पळ काढते आणि मजनूला भेटते. प्रेमकथेतला रोमान्स इथे संपून मग रेशन कार्ड, आधार कार्ड, मुलांचे शाळाप्रवेश वगैरे भानगडी सुरू होतात.
हिंदी सिनेमात या लैलामजनूंच्या अशाच गमती असतात. ‘नीलकमल’ सिनेमात मजनू मरण पावलेला आहे. लैलाचा पुनर्जन्म झालेला आहे आणि तिचं लग्न ठरलं आहे. रात्रीच्या वेळी मजनूचा आत्मा थडग्यातून हाक मारतो. लैला पळत येते. शेवटी (म्हणजे सिनेमा संपत आल्यावर) लैलामागून तिचा नवरा येतो तेव्हा मजनू त्या नवऱयाला सांगतो की तुझी बायको गंगेसारखी पवित्र आहे. मग मजनू हाका मारणं सोडून देतो. ‘बीस साल बाद’ सिनेमात लैला मेलेली आहे आणि मजनूचा पुनर्जन्म झाला आहे. तिचा आत्मा मजनूच्या मागे लागतो आणि शेवटी मजनूची दुष्ट बायको त्याला हाक्लते. एका जुन्या सिनेमातल्या कव्वालीत लैलाची ही पॉवर अचूक सांगितली आहे.
इश्क मजनू की वो आवाज है, जिसके आगे
कोई लैला किसी दीवार से रोकी ना गयी
गेल्या आठवडय़ात लैला-मजनू लोकांचं इंटरनॅशनल आणि मजेदार प्रकरण गाजलं. उस्मानाबादचा मजनू पाकिस्तानमधल्या लैलाच्या प्रेमात पडला. तिने त्याला बोलावलं. ज्याप्रमाणे लैलाला कोणती भिंत अडवू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्याला देखील भारत-पाकिस्तान सीमा अडवू शकणार नाही असं त्याला वाटलं. दुचाकीवर बसून तो निघाला. लॉकडाऊनच्या भिंती त्याला अडवू शकल्या नाहीत. तो गुजरातपर्यंत पोचला. तिथल्या वाळवंटातून पाकिस्तानकडे निघाला. वाळूमध्ये दुचाकी चालवता येईना. म्हणून पायी चालू लागला. त्याला तहान लागली. लैलापर्यंत पोचण्याआधीच तो बेशुद्ध पडला.
तिकडे त्याच्या अरसिक मातापित्यांनी पोलिसात तक्रार केली होती. अरसिक पोलिसांनी त्याला मोबाईलच्या लोकेशनवरून शोधला आणि घरी परत आणला!
कोणीतरी त्याच्यावर कथाकविता लिहील आणि हा प्रियकर मजनू उस्मानाबादी म्हणून विख्यात होईल यात शंका नाही!








