अनेक युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी राबविली स्वच्छता मोहीम
वार्ताहर / मजगाव
मजगाव येथील मुख्य स्मशानभूमीत सलग तीन दिवस श्रमदानाने स्वच्छता करून 20 झाडे लावून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. रविवार दि. 13 रोजी श्री गणेश युवक मंडळाच्या पुढाकाराने लॉकडाऊन कालावधीत येथील तरुणांनी श्रमदान करून स्मशानाची स्वच्छता, ट्रक्टरच्या साहाय्याने सपाटीकरण करून स्वतः वर्गणी काढून स्वच्छता केली.
लॉकडाऊन कालावधीत मृतांची संख्या वाढली होती. त्यावेळी मिळेल तेथे मृतदेह दहन करून सदर स्मशानामध्ये कचरा साचला होता व झाडेझुडुपे वाढली होती.
महानगरपालिकेचे दुर्लक्षच
सदर स्मशानाची स्वच्छता येथील युवक मंडळेच करीत असतात. मजगावात प्रत्येक समाजासाठी स्मशानभूमी आहेत. त्या स्वतंत्र आहेत. परंतु या मुख्य स्मशानभूमीत मराठा, सुतार, लोहार, धनगर, परीट यांच्यासाठीच या स्मशानचा उपयोग केला जात होता. परंतु आता इतर समाजाचे नागरिकही या स्मशानभूमीचाच वापर करू लागले आहेत. कोरोनाच्या संकटावेळी तर शहरातीलही मृतदेह दहन करून गेले आहेत. त्यामुळे स्मशानात कचऱयाचे साम्राज्य पसरले होते. याची दखल येथील तरुणांनी घेऊन यापुढे सदर स्मशानाला कुलूप लावणेचा व फक्त मराठा, सुतार, लोहार, धनगर व परीट समाजाच्या बांधवांनीच येथे दहन करून स्वच्छता राखावी, असा निर्णय येथील उपस्थित युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी
घेतला.
यावेळी श्री गणेश युवक मंडळ, संगोळी रायण्णा युवक मंडळ, श्री विश्वकर्मा युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदर स्वच्छता केल्याबद्दल सर्व युवकांचे कौतुक केले जात आहे.









