प्रतिनिधी /बेळगाव
मजगाव येथील लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त सोमवार दि. 5 रोजी पहाटे 6.35 च्या शुभमुहूर्तावर श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा झाला.
दि. 30 मार्चपासून सदर यात्रोत्सव सुरू झाला असून 8 एप्रिलपर्यंत विविध धार्मिकोत्सव कार्यक्रम चालणार आहेत. सोमवारी प्रतिष्ठापनेचा विधिवत पूजा, अभिषेक झाल्यानंतर विवाह सोहळा उत्साहाने झाला. विवाह सोहळय़ाला मजगाव, खादरवाडी, पिरनवाडी, हुंचेनहट्टी व परिसरातील उपनगरातील भाविक उपस्थित होते.
यावेळी मंदिर परिसरात सॅनिटायझर करण्यात आले होते. तसेच सामाजिक अंतर ठेवून विवाह सोहळा पार पडला. पहाटेपासून मजगावात भाविक हजर झाले होते. यावेळी गाव पंचमंडळींनी शिस्तबद्ध नियोजन केले होते.
सुरुवातीला मानकऱयांच्या हक्काप्रमाणे गावचे पोलीस पाटील माणिक पाटील व मारुती गल्लीतील मजुकर कुटुंबीयांचे मानाचे आहेर व ओटी स्वीकारून मजगाव, खादरवाडी, पिरनवाडी, हुंचेनहट्टी गावच्या पंच कमिटीच्या ओटय़ा स्वीकारून मंदिरात पहाटे धार्मिक विधीला प्रारंभ झाला. पाच पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनंतर श्री लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा शांततेत पार पडला. यानंतर भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मास्क लावून सामाजिक अंतराचे भान ठेवून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण दिवसभर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
मंदिर आज बंद
मंदिर मंगळवार दि. 6 रोजी देवीला विश्रांतीसाठी बंद राहणार आहे. बुधवारी महिलांसाठी ओटी भरण्याकरिता मुभा देण्यात आली आहे. पिरनवाडी, खादरवाडी, हुंचेनहट्टी व उपनगरातील सर्व भाविक महिलांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम साध्या पद्धतीने शांततेत नियमांचे पालन करत करण्याचे आवाहन पंच कमिटीने केले आहे.









