पीडब्ल्यूडी अधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर /किणये
बेळगाव-पणजी महामार्गावरील मच्छेनजीकच्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. या मागणीचे निवेदन गुरुवारी दुपारी पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकाऱयांना देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गालगतच मच्छे गाव आहे. गावच्या बसस्टॉपजवळ वाघवडे रोडनजीक व भारतनगरजवळ महामार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अंगणवाडी शाळा, प्राथमिक मराठी-कन्नड शाळा, हायस्कूल, विविध कार्यालये, मच्छे औद्योगिक वसाहत यामुळे या महामार्गावरून मच्छे परिसरात रोज विद्यार्थ्यांसह नागरिकांची वर्दळ असते. मात्र, महामार्गावरून येणारी वाहने सुसाट धावतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी मच्छेनजीक अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. सदर महामार्गावरून स्थानिकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
येथे वाहनधारकांवर नियंत्रण आणण्यासाठी गतिरोधकाची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी रमेश मेत्री यांच्याकडे मच्छे येथील नागरिकांनी निवेदन दिले. आम्ही मच्छे भागात येऊन पाहणी करून योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन अधिकाऱयांनी त्यांना दिले. निवेदन देताना सचिन बेळगावकर, राहुल पाटील, राजू चौगुले, अशोक सुतार, आकाश घाडी, सागर चौगुले, बसू हिरेमठ आदी उपस्थित होते.









