बेळगाव-पणजी महामार्गावर दोन तास रास्तारोको : वाहतूक ठप्प

वार्ताहर /किणये
मच्छे गावातील बसथांब्याजवळ खानापूर व इतर गावांहून येणाऱया बसेस न थांबविल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवारी बेळगाव-पणजी महामार्गावरील मच्छे येथे रास्तारोको करण्यात आला. सुमारे दोन तास रास्तारोको केल्यामुळे वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. बससाठीच्या या आंदोलनाला अखेर यश आले असून शनिवारपासून मच्छे व झाडशहापूर गावासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
मच्छेतील शेकडो विद्यार्थी बेळगावला शाळा व कॉलेजला जातात. या गावाला स्वतंत्र बससेवा नसल्यामुळे खानापूर व इतर गावच्या बसेसवर अवलंबून राहावे लागते. विद्यार्थी गावातील बसथांब्याजवळ रोज बसची वाट पाहत थांबतात. मात्र खानापूर व इतर ठिकाणांहून येणाऱया बसेस या ठिकाणी न थांबताच पुढे जातात. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना तासन्तास बसथांब्यावर ताटकळत बसण्याची वेळ आली होती. यापूर्वी अनेकवेळा रास्तारोको केला होता. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱयांना निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर शुक्रवारी सकाळी विद्यार्थी व ग्रामस्थांतर्फे बससाठी एल्गार पुकारण्यात आला.
मच्छे येथे बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजला जाण्यासाठी उशीर होत होता. यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. आम्ही कित्येक वेळा सांगूनही परिवहनच्या अधिकाऱयांकडून बसवाहक व चालक यांना तशा सूचना देण्यात येत नाहीत. या ठिकाणी बस थांबत नसल्यामुळे शाळा व कॉलेजला जाण्यासाठी उशीर होत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
मच्छे गावचा विस्तार झपाटय़ाने वाढला आहे. औद्योगिक वसाहती, विविध कार्यालयांमुळे गावात उपनगरांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या गावातून बेळगाव शहराकडे शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या विद्यार्थ्यांना गावातून स्वतंत्र बस नसल्यामुळे इतर गावच्या बसमधूनच प्रवास करावा लागतो. मात्र येथे बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी वैतागून गेले होते.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बेळगाव-पणजी महामार्गावरील मच्छे येथे बससाठी रास्तारोको करण्याचे ठरविले होते. त्यानुसार विद्यार्थी व गावातील नागरिक मोठय़ा संख्येने या ठिकाणी जमले. मात्र त्यावेळी पोलीस व परिवहनचे अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी बस सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी अधिकाऱयांना निवेदनही ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले होते. पंधरा दिवस उलटूनही गावासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात आली नसल्यामुळे संतप्त विद्यार्थी व ग्रामस्थांनी अखेर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून विद्यार्थी व ग्रामस्थ मुख्य रस्त्यावर जमा झाले. त्यांनी सुरुवातीला केवळ कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या सरकारी बस आडवून आपला मोर्चा सुरू केला व मच्छे येथून येणाऱया बस थांबविल्या पाहिजेत, तसेच आम्हाला स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली.
तणावपूर्ण वातावरण
हा मोर्चा सुरळीत चालू असतानाच खानापूरहून बेळगावकडे जाणाऱया एका पोलीस वाहनातून एका कॉन्स्टेबलने उतरून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र या ठिकाणी बराच गोंधळ निर्माण झाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी महामार्गावरील सर्व वाहने अडविण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. वडगाव ग्रामीणचे सीपीआय श्रीनिवास हंडा व त्यांचे सहकारी या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर वातावरण निवळले.
राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी, पोलीस खात्याचे अधिकारी या मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर ग्रामस्थ व अधिकाऱयांची सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आलेल्या अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले व आम्ही किती वेळा या ठिकाणी मोर्चा काढायचा आणि तुम्हाला जाग कधी येणार? इथल्या विद्यार्थ्यांना बससेवा कधी मिळणार? असे विचारण्यात आल्यानंतर अखेर परिवहनच्या अधिकाऱयांनी खानापूर व इतर गावाहून येणाऱया बस मच्छे येथे थांबविण्यासाठी आम्ही त्या बसचालक व वाहकांना सांगू तसेच शनिवार दि. 20 पासून मच्छे व झाडशहापूर गावासाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.
या मोर्चामध्ये संतोष जैनोजी, सुरेश लाड, शांताराम पाटील, संजय सुळगेकर, सुरेश चौगुले, अमर गुरव, भुजंग चौगुले, विनायक पाटील, विनायक चौगुले, सूर्यकांत मरुचे, सागर जैनोजी, शुभम केसरकर, मल्लाप्पा मर्वे, गोपाळ पाटील, सचिन बेळगावकर आदींसह गावातील प्रमुख मंडळी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आजपासून स्वतंत्र बससेवा होणार सुरू
शनिवार दि. 20 पासून मच्छे झाडशहापूर गावाला स्वतंत्र बससेवा सुरू करण्यात येणार असून या बससेवेचे वेळापत्रक राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी मच्छे गावातील काही प्रमुख मंडळींना शुक्रवारी सायंकाळी पाठवून दिले आहे. शनिवारपासून गावाला स्वतंत्र बससेवा सुरू होणार असल्यामुळे अखेर या आंदोलनाला यश आले आहे.









