निसर्ग चक्रीवादळ मदत : मच्छीमारांमध्ये संतापाची लाट – दामोदर तांडेल
25 कोटी रुपये भरपाई द्या!
मच्छीमारांना दिलासा देण्याची मागणी
प्रतिनिधी / मालवण:
निसर्ग चक्री वादळाचा तडाखा कोकणातील जिल्हय़ांना बसला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्हय़ातील जनजीवन मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाले. मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून केंद्र शासनाने विहीत केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने 10 जून रोजी शासन निर्णय परिपत्रक प्रसिद्ध केला आहे. त्यात 1 ते 7 मुद्यांमध्ये फक्त घरांच्या झालेल्या नुकसानीचा, झोपडय़ांचा, दुकानदार, टपरी व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहीर केले आहे. या परिपत्रकात मच्छीमारांच्या नौका, इंजिन, जाळ्य़ांचे, मासेमारी साहित्य व मोठय़ा प्रमाणात सुक्या मासळीचे नुकसान झालेले असताना त्याचा समावेश नसल्यामुळे मच्छीमारांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिली.
गेल्या वर्षी ऑगस्टपासून तीन-चार चक्री वादळात झालेली नुकसान भरपाई देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदारांमार्फत माहिती गोळा केल्यानुसार जिल्हय़ाला साडेसात कोटी, इतर जिल्हय़ांत सात-आठ कोटींच्या नुकसानीचा अहवाल सादर केलेला आहे. गेल्या वर्षाच्या वादळामुळे मच्छीमारांना 50 कोटींची भरपाई मिळायला हवी होती. ती अद्याप मिळालेली नाही. या वादळात मच्छीमारांचे 20 ते 25 कोटींचे नुकसान झाले आहे. कोविड-19 च्या संकटामुळे मासेमारी व्यवसाय संपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. मच्छीमार समाज उपासमारीला तोंड देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मागील 50 कोटींची भरपाई व या वादळाची 25 कोटी भरपाई राज्य शासनाने त्वरित मंजूर करावी म्हणून मच्छीमारांसाठी नव्याने वेगळे परिपत्रक महसूल व वन विभागाने मंजूर करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा करताना अनेक मच्छीमार गावांना भेटी दिल्यानंतर मच्छीमार समाजाचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. विशेषत: शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मच्छीमारांच्या नौका बुडाल्यामुळे इंजिनाचे व मासेमारी साहित्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्यांचा व्यवसाय उभा करावा लागेल. त्यांची नौका, इंजिन दुरुस्तीचा खर्च मोठय़ा प्रमाणात येणार आहे. मच्छीमारांना आर्थिक मदत मिळाली नाही, तर मासेमारी व्यवसायच करू शकणार नाहीत, याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. गेले वर्षभर मासेमारी व्यवसायच न झाल्यामुळे व कोरोनामुळे मच्छीमार समाज उपासमारीला तोंड देत आहे. मग मत्स्य शेती करणाऱया मच्छीमारांना उपेक्षित का ठेवले आहे? असा सवाल तांडेल यांनी शासनाला विचारला आहे.
खासदार तटकरे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
महसूल व वन विभागाने 10 जूनच्या परिपत्रकात मच्छीमारांना आर्थिक मदत देण्याचा उल्लेख का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या निर्दशनास हे आणल्यानंतर, त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी आजच चर्चा करून वादळात मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीचे वेगळे परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षात तीन-चार वादळांमुळे झालेले 50 कोटींची व या चक्रीवादळामुळे 25 कोटींची भरपाई देण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेऊन मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचे महसूल व वन विभागाने वेगळे परिपत्रक मंजूर करून मच्छीमार समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.









