प्रतिनिधी/ दापोली
समुद्रामध्ये सुरू असणाऱया एलईडी, फास्टर बोट व पर्ससीननेटद्वारे चालणाऱया अवैध मासेमारीच्या विरोधात दापोली, मंडणगड, गुहागर येथील मच्छीमार बांधवांचे साखळी उपोषण शुक्रवारी पाचव्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनात सहभागी होत माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या प्रश्नी राज्यपालांना भेटणार असल्याचे सांगितले.
मच्छीमार बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खोत शुक्रवारी दापोली येथे आले हेते. यावेळी ते म्हणाले, सरकार गेंडय़ाच्या कातडीचे व अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. 12 नॉटिकलच्या पुढे सर्व अवैध मासेमारी होते, अशी खोटी माहिती अधिकारी सरकारला देतात. मात्र हे सर्व 12 नॉटिकलच्या आत सुरू असते. बारा नॉटिकलपर्यंत राज्य शासनाची हद्द असूनही हे अधिकारी बेकायदा मासेमारीला आळा घालत नाहीत. याचा अर्थ हे सर्व भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडालेले आहेत. या पार्श्वभूमीवर कोळी समाजबांधवांचे प्रश्न घेऊन मंगळवारी राज्यपालांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खोत यांच्यासह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, माजी तालुकाध्यक्ष श्रीराम इदाते, माजी आमदार सूर्यकांत दळवी आदी उपस्थित होते.









