महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पहिलीच नोंद : पालघर सातपाटी येथील घटना
संदीप बोडवे / देवबाग:
पालघर सातपाटी येथील मच्छीमार नितीन पाटील यांना समुद्रात मासेमारी करताना जाळ्य़ात दुहेरी डोक्यांचा दुर्मिळ शार्क सापडल्याची घटना नुकतीच घडली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून ही पहिलीच घटना नोंदली गेली असल्याचे सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. तर अशा प्रकारची दुर्मिळ मत्स्य संपदा जाळ्य़ात अडकल्यास मच्छीमारांनी मत्स्य तज्ञांशी संपर्क साधावा, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.
शुक्रवारी पालघर येथे समुद्रात 70 वावात मासेमारी करत असताना नितीन पाटील यांना त्यांच्या मासेमारी जाळ्य़ात सहा इंच लांबीचे शार्क माशाचे पिल्लू सापडले, ज्याला दोन डोकी होती. विचित्र शार्क पाहून गोंधळलेल्या नितीन पाटील यांनी शार्क परत समुद्रात सोडण्यापूर्वी काही छायाचित्रे आणि व्हीडिओ काढले. जेव्हा त्यांनी इतर मच्छीमारांशी या संदर्भात चर्चा केली, तेव्हा त्यांना ही दुर्मिळ घटना असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी पालघर येथील मच्छीमार नेते उमेश पालेकर यांच्या मदतीने ही बाब मत्स्य शास्त्रज्ञांच्या लक्षात आणून दिली.
सीएमएफआरआयच्या शास्त्रज्ञांच्या मते, दोन डोक्यांचे शार्क समुद्रात फारच दुर्मिळ आहेत. याला ‘डायसाफली’ही म्हणतात. शार्कसह अनेक प्राण्यांमध्ये ही घटना घडली आहे. जन्मजात उत्परिवर्तन किंवा इतर भ्रूण विकृती, विकारांमुळे असे जीव जन्मास येतात हे फारच दुर्मिळ आहेत. उत्तर हिंद महासागराच्या बाहेरील इतरत्रही अशीच प्रकरणे नोंदविली गेली आहेत.
महाराष्ट्र किनाऱयावरील पहिलीच घटना
सीएमएफआरआयच्या नोंदीनुसार, 1964 मध्ये गुजरातात अशीच दोन डोके असलेली शार्क आढळली होती, तर 1999 मध्ये कारवार येथून दोन डोक्यांच्या स्पॅडेनोज शार्कची नोंद झाली होती, 2008 मध्ये हिंद महासागरात दुहेरी डोक्याचे निळ्य़ा शार्कचे भ्रूण सापडले होते. तसेच आंध्र प्रदेशात 1984 साली दुहेरी डोक्याच्या इगल रे प्रजातीची नोंद झाली होती.
अशी प्रजाती पहिल्यांदाच पाहिली – पालेकर
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष उमेश पालेकर म्हणाले, आपण यापूर्वी अशी मत्स्य प्रजाती पाहिली नव्हती. आमचा विश्वास आहे, की मोठय़ा शार्कपैकी एकाने या दुहेरी डोके असलेल्या शार्कच्या पिल्लाला जन्म दिला असेल. आम्ही भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टिटय़ूट (आयसीएआर-सीएमएफआरआय), मुंबईच्या वैज्ञानिक आणि इतर सागरी जीवशास्त्रज्ञांनीच संपर्क केला व छायाचित्रे आणि व्हीडिओ पाठविले. त्यांनी पुष्टी केली, की हे अत्यंत दुर्मिळ दस्तऐवजीकरण आहे. महाराष्ट्राच्या समुद्रातून दोन डोके असणारे शार्कची ही पहिली नोंद आहे.
सागरी संशोधकांशी संपर्क साधावा – तांडेल
मुंबई येथील सागरी संशोधक स्वप्नील तांडेल म्हणाले, भारतीय किनाऱयावर दुहेरी-डोक्याचे शार्क फारच क्वचित आढळतात. ही स्पॅडेनोझ शार्क (स्कोलियोडॉन लॅटिकाउडस) किंवा शार्पनोझ शार्क (राइझोप्रिओनोदोन प्रजाती) पैकी आहे हे दोघेही व्हीव्हीपेर्स म्हणजेच पिल्ले मादी शार्कच्या शरीरात विकसीत होऊन बाहेर जन्म घेतात. ही मरिन सायन्सच्या दृष्टीने महत्वपूर्ण घटना असून मासेमारांना त्यांच्या जाळ्य़ात असे दुर्मिळ मासे सापडले, तर सागरी संशोधकांशी संपर्क साधावा.









