पंजाब/प्रतिनिधी
पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून बाहेर आल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला. त्यानुसार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत पक्षावर असणारी नाराजी व्यक्त केली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मला मला अपमानित झाल्यासारखा वाटतंय असं म्हंटलं होतं. दरम्यान, पंजाब काँग्रेसमधील मतभेद शांत करण्याच्या प्रयत्नात असताना आता पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्वच वादात सापडलं आहे. त्यामुळे, आता काँग्रेसमध्ये ‘राग आणि अपमान’ यावर युद्ध सुरू झालं आहे. राजकारण आणि राग यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने दिलेल्या प्रतिक्रियेवरून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस हायकमांडवर प्रहार केला आहे. “जर राजकारणात रागाला स्थान नसेल तर मग अपमानाला आहे का? असा सवाल अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेतृत्वाला विचारला आहे. त्यामुळे, काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
पंजाब काँग्रेसमधील कलह दूर करण्यासाठी हायकमांडने केवळ पक्षाचाच नव्हे तर राज्यातील सरकारचा चेहरामोहरा बदलला आहे. मात्र, काँग्रेसची चिंता कायमच आहे. कारण, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे सातत्याने संकेत देत आहेत की येत्या काळात ते काही मोठी पावलं उचलू शकतात. यामुळे पक्षाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांना एक सल्ला देताना त्या असं म्हणाल्या की, “राजकारणात राग, द्वेष, एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर टिप्पणी करणं आणि त्याच्यावर सूड उगवणं या सगळ्या गोंष्टींसाठी कोणतीही जागा नाही. मला आशा आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग नक्कीच समजूतदारपणा दाखवून आपल्या शब्दांचा पुनर्विचार करतील.” पुढे सुप्रिया श्रीनेत यांनी असंही म्हटलं की, “जर कोणाला पक्ष सोडायचा असेल तर मी त्यावर टिप्पणी करणार नाही.”
सुप्रिया श्रीनेटच्या या विधानावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपले माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांच्याद्वारे निवेदन जारी करून प्रत्युत्तर देण्यास जराही विलंब केला नाही. “राजकारणात रागाला स्थान नसेल तर अपमानाला जागा आहे का? माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या बाबतीत असं होऊ शकतं तर कार्यकर्त्यांचं काय होईल?”, असा सवाल कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेसला नेतृत्त्वाला विचारला होता









