– मॅनेज झाले म्हणणाऱ्यांना दिले प्रत्त्युत्तर
– राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांबाबत दिली माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात ठोक मोर्चा निघाला. लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र फेरविचार याचिका, क्युरीटीपिटीशन आणि घटनादुरुस्ती या तीन पर्यायांमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. यासाठी किमान दीड वर्षांचा कालावधी लागेल. मग दीड वर्ष रस्त्यावरच उतरायचे काय? यापूर्वी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन 58 मूक मोर्चे काढत समाजाने सरकार समोर भावना मांडल्या आहेत. समाजाच्या अन्य मागण्या सोडविण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. चर्चेतून प्रश्न सुटत असताना कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत रस्त्यावरील आंदोलन कशासाठी, असा प्रश्न खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित करत मॅनेज झाले म्हणणाऱयांना प्रत्त्युत्तर दिले. तसेच आंदोलन करताना परिस्थितीचे भान जपा असा सल्लाही त्यांनी आंदोलकांना दिला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी कोल्हापुरात सारथी संस्थेच्या उपकेंद्राचे उद्घाटन झाले. यानंतर रविवारी संभाजीराजे यांनी भवानी मंडप येथे समस्त सकल मराठा समाजासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा समाजाच्या मान्य केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
खासदार संभाजीराजे म्हणाले, सध्याची परिस्थिती रस्त्यावर उतरुन लढाई करण्याची नाही. मूक आंदोलनाऐवजी मोर्चा काढणे शक्य होते. मात्र मोर्चाला मोठÎा प्रमाणात समाजबांधव एकत्र आले असते. यामधून पुन्हा राज्यभर कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका होता. कोल्हापुरातील मोर्चाने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला असा ठपका कोल्हापूरवर बसला असता. समाज बोलला, समन्वयक बोलले आता लोकप्रतिनिधी बोलतील अशी आंदोलनाची दिशा आहे. त्यानुसार आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात जे सहभागी होतील त्यांना सोबत घेऊन जाण्याची आपली भूमिका असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
2185 उमेदवारांबाबत लवकरच निर्णय
एसईबीसी आरक्षणातून निवड झालेल्या 2185 उमेदवारांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. सराकारसोबत चर्चा केली आहे. सरकारने याप्रश्नी या उमेदवारांना कोणत्या पद्धतीने शासकीय सेवेत सामावून घेता येईल, यावर अभ्यास करण्यासाठी 14 दिवसांची मुदत मागितली आहे. अभ्यासकरुन मार्ग काढा, पण त्यांना सेवेत सामावून घ्या, अशी मागणी केली आहे. याप्रश्नी सराकर सकारत्मक असून लवकरच निर्णय होईल, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
संभाजीराजेंना पाठबळ देण्याचा निर्धार
मराठा आरक्षणप्रश्नी राज्यासह, देशात संभाजीराजेंचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली आहे. समाजाच्या मागण्या पूर्ण होत आहेत. मात्र अशा सकारात्मक परिस्थितीत कोल्हापुरात ठोक मोर्चा काढत पर्यायी व्यवस्था उभारण्याचे षडयंत्र काही जणांकडून सुरु आहे. मात्र सकल मराठा समाजाने संभाजीराजेंचे नेतृत्व मान्य केले आहे. समाज नेहमीच त्यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातुनही संभाजीराजेंना पाठबळ देण्याचा निर्धार यावेळी समस्त समाजाने केला.
सरकारसोबतच्या बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय
– सराथी संस्थेसाठी लवकरच मोठÎा रकमेची घोषणा
– नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती येथेही सुरु होणार सारथीचे उपकेंद्र
– सारथी संस्थेतंर्गतही सुरु होणार वसतिगृह
– पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेतून राज्यात 23 ठिकाणी वसतिगृह
– अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्जमर्यादा 25 लाख होणार
– अटी, शर्थीही शिथिल करण्याची मागणी
– 149 गुन्हांपैकी 148 गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु
– कोपर्डी अत्याचारप्रकरणी स्पेशल बेंचची स्थापना
– शिवाजी महाराज, शाहू महाराज स्मृतीग्रंथ प्रत्येक ग्रामपंचायत, महाविद्यालयात देणार
– आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 42 जाणांच्या वारसांना शासकीय सेवेत समावून घेणार









