आमदार सुदिन ढवळीकरांचे सरकारला आव्हान
प्रतिनिधी / फोंडा
सरकारने राज्यस्तरीय शिमगोत्सव मिरवणूक केवळ तिनच तालुक्यामध्ये जाहीर करून लोककलाकार, चित्ररथ कलाकार व शिमगोप्रेमींची घोर निराशा केलेली आहे. शिमगोत्सव हा गोव्याचा प्रमुख लोकोत्सव असून प्रथेनुसार तो सर्व बाराही तालुक्यात साजरा झाला पाहिजे. सरकारला यंदा ते परवडत नसल्यास त्यांनी आम्हाला तशी परवानगी द्यावी. मगो पक्ष उर्वरित सर्व तालुक्यामध्ये शिमगोत्सव साजरा करण्यास समर्थ आहे, असे आव्हान मगो नेते व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे.
शिमगोत्सव तिनच तालुक्यात साजरा झाल्यास लाखो रुपये खर्चून चित्ररथ उभारणारे कलाकार, तसेच रोमटामेळ व लोककला पथकांना परवडणारे नाही. फोंडा तालुक्यातील शिमगोत्सवाची तारीखही सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. कलाकारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या शिमगोत्सवातील मानधनाची रक्कम अनेक पथकांना अद्याप मिळालेली नाही, असे सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
मोपातील शेतकऱयांना 25 वर्षांचा मोबादला द्या
मोपा विमानतळाच्या रस्त्यासाठी शेतकऱयांच्या जमिनीला तिप्पट भाव देऊ हे मुख्य़मंत्र्यांचे विधान हास्यास्पद आहे. शेतकऱयांच्या जमिनीचे मोल सरकारला करता येणार आहे. अनेक वर्षे घाम गाळून त्यांनी शेती बागायती वसवली आहे. विविध प्रकारच्या झाडांमुळे त्यांना उत्पन्न मिळत आहे. सरकारला मोबदलाच द्यायचा झाल्यास तो पुढील 25 वर्षांची नुकसान भरपाई म्हणून द्यावा लागेल. शिवाय मोपाला रस्ता करताना 100 मिटर ऐवजी 60 मिटर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
म्हादईच्या मुद्दय़ावर बोलताना सुदिन ढवळीकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण हे ठिक आहे. मात्र कळसा भंडुराची जागा कर्नाटकच्या हद्दीत असल्याने प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या दिवशी ते सर्व गोष्टी सुस्थितीत आणतील. दरवर्षी मार्च-एप्रिलपर्यंत म्हादईचा प्रवाह कमी व्हायचा. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तो कमी झालेला आहे. परिणामी खांडेपार बंधाऱयापर्यंत जुवारीचे खारे पाणी खांडेपार नदीत शिरु लागले आहे. ओपा पाणी प्रकल्पावरही त्याचा परिणाम होणार आहे, असा इशारा सुदिन ढवळीकर यांनी दिला.
भाजपा युतीसाठी विश्वासार्ह नाही
येणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत युतीची करणार काय ? या प्रश्नावर त्यांनी तशी शक्यता फेटाळून लावली. भाजपा हा पूर्वीचा राहिलेला नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवल्यास कधी घात करतील हे सांगता येणार नाही. इतर पक्षांशी युतीसंबंधी आपण स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. सध्या 18 मतदारसंघामध्ये पक्ष बांधणीचे काम सुरु आहे. यंदा बहुतेक तरुण उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार असून काही मतदारसंघांमध्ये महिलांचाही विचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









