17 जानेवारीला होणार आमसभा : पक्षात कोणतीही फूट-दुफळी नाही : अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची केंद्रीय समितीची संघटनात्मक निवडणूक व मतदान 16 जानेवारी रोजी घेण्यात येणार असून 17 जानेवारी रोजी आमसभा निश्चित करण्यात आली आहे. त्यात मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मगो पक्ष एकसंघ आणि अखंडित असून त्यात कोणतीही फूट किंवा दुफळी नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
सध्या 15 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून उमेदवार मिळाले तर 29 जागा लढवण्याचाही पक्षाचा इरादा आहे, नाहीतर ‘एकला चलो रे’ धोरण राबवले जाईल, परंतु भाजपशी युती करणार नसल्याचे सांगण्यात आले.
मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची काल बैठक काल गुरुवारी पणजीत झाली आणि त्यात निवडणुकीचा कार्यक्रम ठरवण्यात आला तसेच इतर अनेक विषयांवर चर्चा झाली. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार अशा विविध पदांसाठी निवडणूक होणार आहे.
अशी आहे मगोप निवडणूक प्रक्रिया
अर्ज भरण्याची तारीख 5 व 8 जानेवारी
अर्जांची छाननी 9 जानेवारी
अर्ज मागे घेण्याची मुदत 11 जानेवारी
उमेदवारांची अंतिम यादी 12 जानेवारी
मतदान 16 जानेवारी
मतमोजणीची 17 जानेवारी
17 जानेवारी रोजी आमसभा
दि. 17 जानेवारी रोजी पक्षाची सर्व साधारण आमसभा होणार असून त्यात निकाल घोषित करणार असल्याचे सांगून ढवळीकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामाही दाखवला. गरीब आणि दुर्बल घटकांना पाणी, वीज मोफत देण्यात येणार असून बेकारांना किमान रु. 5000 बेकारी भत्ता देणार असल्याचे ते म्हणाले. मगोप सत्तेवर आला तर मुंडकार प्रकरणे दोन वर्षात संपवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या 15 मतदारसंघात पक्षाची निवडणूक तयारी चालू आहे, तर 7 ते 8 मतदारसंघात उमेदवारही ठरल्याचे ढवळीकर म्हणाले.
लवू मामलेदारांच्या कृतीचा निषेध
मगो पक्षाचे स्वत:ला सरचिटणीस म्हणवून घेणारे लवू मामलेदार यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून ते आता विनाकारण पक्षावर चिखलफेक करीत आहेत. ज्या मगो पक्षाने त्यांना आमदार केले त्याच पक्षावर ते टीका करतात म्हणून ढवळीकर यांनी त्यांचा केंद्रीय समिती बैठकीत निषेध नोंदवण्यात आल्याची माहिती दिली.
आमदार अपात्रता याचिका निकाल प्रलंबित
कोरोना संकटामुळे मगो पक्षाची निवडणूक तसेच आमसभा होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यमान केंद्रीय समितीला मुदतवाढ देणे भाग पाडले, अशी कारणे देऊन ढवळीकर म्हणाले की, इतर पक्ष मगोबाबत नको ते बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. मगोचे आमदार फुटले आणि त्यांची अपात्रता याचिका सर्वोच्च न्यायालयात तसेच सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे प्रलंबित आहे, त्याचाही निकाल लावला जात नाही, अशी खंत ढवळीकर यांनी प्रकट केली.
गोमांसप्रकरणी भाजपचा दुटप्पीपणा
गोव्यात व कर्नाटकात भाजपचे सरकार आहे, तेव्हा गोमांस प्रकरणी भाजपने जो कायदा कर्नाटकात लावला तोच कायदा ते गोवा राज्यात का लागू करीत नाहीत? असा सवाल ढवळीकर यांनी केला. पक्ष जर एकच आहे तर दोन्ही राज्यात गोमांस विषयी एकच धोरण असले पाहिजे, असे ते म्हणाले. मगो पक्षाचे नेतृत्व आता नव्या पिढीकडे देण्याचा विचार चालू असून त्यासाठी युवकांना पक्षात स्थान दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









